Sangali Gram Panchayat Election Result 2022 : खानापूर, तासगाव तालुक्यातील पहिल्या फेरीचा निकाल जाहीर | पुढारी

Sangali Gram Panchayat Election Result 2022 : खानापूर, तासगाव तालुक्यातील पहिल्या फेरीचा निकाल जाहीर

विटा; पुढारी वृत्तसेवा : खानापूर तालुक्यात पहिल्या फेरीत आळसंद, वाझर, कमळापूर आणि पंचलिंगनगर या चार ग्रामपंचायतींची मतमोजणी पूर्ण झाली. यामध्ये आळसंद आणि पंचलिंगनगर या दोन ग्रामपंचायती बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार अनिल बाबर यांच्या गटाकडे गेल्या आहेत. तर कमळापूर ग्रामपंचायत राष्ट्रवादीचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या गटाकडे गेली आहे.

अखिल भारतीय सरपंच परिषदेचे कार्याध्यक्ष नितीन जाधव पराभूत

खानापूर तालुक्यात पहिल्या टप्प्यात सत्तांतराचा कौल मतदारांनी दिला आहे. आळसंद, वाझर , पंचलिंगनगर ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाले आहे. आळसंद ग्रामपंचायत सरपंच पदाचे उमेदवार अखिल भारतीय सरपंच परिषदेचे कार्याध्यक्ष नितीन जाधव यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. बाळासाहेबांची शिवसेना गटाचे हिम्मतराव जाधव यांचे चिरंजीव अजित जाधव यांनी सरपंच परिषदेचे कार्याध्यक्ष नितीन जाधव यांना पराभवाची धूळ चारली.

तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीला सकाळी ९ : ४० वा. सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आळसंद आणि पंचलिंगनगर या दोन ग्रामपंचायती बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार अनिलराव बाबर यांच्या गटाकडे गेल्या आहेत. तर कमळापूर ग्रामपंचायत राष्ट्रवादीचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या गटाकडे गेली आहे. वझरमध्ये आजी-माजी आमदारांचा एक संयुक्त गट निवडून आला आहे. येथे सरपंच पदासाठी माधुरी विनायक जाधव या आमदार अनिल बाबर गटाच्या उमेदवार निवडून आल्या आहेत.

विटा येथील शासकीय गोदामाच्या इमारतीमध्ये एकुण १६ टेबलवर इव्हीएम मशीनची तर ४ टेबलांवर टपाली मतांची मोजणी सुरू आहे. दुपारी २ वाजेपर्यंत सर्व ग्रामपंचायतींचे निकाल हाती येणे अपेक्षित आहे. मतमोजणी एकुण ९ टप्प्यांमध्ये होत आहे,

तासगाव तालुक्यात पहिल्या फेरीचा निकाल जाहीर

तासगाव तालुक्यात पहिल्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाली आहे. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत 3 ग्रामपंचायतींवर भाजपचे खासदार संजय पाटील गटाची तर 2 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीच्या आमदार सुमन पाटील गटाची सत्ता आली आहे.

लिंब : भाजप
भैरववाडी : भाजप
कचरेवाडी : राष्ट्रवादी
पानमळेवडी : भाजप
नागेवाडी : राष्ट्रवादी

Back to top button