सांगली : शाळेचे झाले भंगार गोडाऊन; महापालिकेच्या शाळा क्रमांक एकची दुरवस्था | पुढारी

सांगली : शाळेचे झाले भंगार गोडाऊन; महापालिकेच्या शाळा क्रमांक एकची दुरवस्था

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  एका बाजुला सांगली सुंदर करायची स्वप्ने दाखवली जात असताना दुसऱ्या बाजुला ज्ञानमंदिर समजल्या जाणाऱ्या शाळांची अवस्था मात्र नुसतीच अस्वच्छ नाही तर ती गंभीरही बनली आहे. अपवाद सोडता महापालिकेच्या साया शाळांच्या इमारतींची अवस्था वाईट झाली आहे.

सांगली महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीजवळ शाळा क्रमांक एकची इमारत आहे. पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील यांच्या नावाने उभे असलेले हे विद्यामंदिर बाहेरुन रंगरंगोटी करून सुंदर केले असले तरी आतून मात्र त्यांची अवस्था बिकट झाली आहे.
इमारतींच्या भिंतींचा गिलावा पडला आहे. स्लॅबच्या आतील लोखंडी सळ्यासुध्दा दिसायला लागल्या आहेत. कठडे ढासळण्याच्या स्थितीत आहेत. खिडक्यांची वाट लागली आहे. गंजून गेल्या आहेत. भिंतीवर झाडं उगवून वाढली आहेत. याच इमारतीत स्वच्छतागृह होते.  म्हणजे आता त्याचे भंगार गोडाऊन झाले आहे.  महापालिकेच्या विज कामाचे सारे भंगार या स्वच्छतागृहात आणून टाकले आहे. खरे तर या भागात एकही सार्वजनिक स्वच्छतागृह राहिले नाही. सारी पाडून टाकली आहेत. या इमारतीत असलेले स्वच्छतागृह वापरायोग्य केले असते तर त्याचा खुप फायदा झाला असता, पण रिकाम्या इमारतीचे भंगार गोडावून करण्यापलिकडे महापालिकेची उडी जात नाही.

शाळेचे स्वच्छतागृह अस्वच्छ आहे. मागण्या करुनही ते स्वच्छ केले जात नाही. नावालाच ही इमारत शाळेची आहे, पण महापालिकेला वाटणारा सारा भंगार माल टाकण्यासाठीच ती वापरली जाते आहे. ही परिस्थिती सुधारुन ही शाळा खऱ्या अर्थाने विद्यामंदिर करावी अशी मागणी होत आहे.

Back to top button