सांगली : समडोळीत घर, दुकाने फोडली | पुढारी

सांगली : समडोळीत घर, दुकाने फोडली

सांगली; पुढारी वृत्तसेवा : समडोळी (ता. मिरज) येथे चोरट्यांनी धुमाकूृळ घालत घर, दुकान, खासगी प्रयोगशाळा व किराणा मालाचे दुकान फोडले. सोन्या-चांदीचे दागिने, रोकड व अन्य साहित्य असा एकूण सव्वालाखाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. एकाच रात्रीत चार ठिकाणी धाडसी चोर्‍या झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

समडोळीतील शांतीनाथ जैन मंदिर परिसरात या चार ठिकाणी चोर्‍या झाल्या. राकेश महावीर उपाध्ये यांचे किराणा मालाचे दुकान आहे. मंगळवारी रात्री दहा वाजता दुकान बंद करून ते घरी गेले होते. त्यानंतर ते कुटुंबासह परगावी गेले. मध्यरात्री चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

कपाट उघडून त्यामधील साहित्य विस्कटून टाकले. लॉकरमधील लहान मुलांचे सोन्या-चांदीचे असा 46 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याचठिकाणी डॉ. श्रद्धा प्रसाद बेले यांचा दवाखाना आहे. तोही चोरट्यांनी फोडून उपचाराचे 70 हजार रुपये किमतीचे साहित्य लंपास केले. तसेच पराग सुरेंद्र गिड्डे व अभिषेक महावीर मुंडे यांचे कपड्याचे दुकान व प्रयोगशाळा फोडून चोरट्यांनी एक हजार रुपयांची रोकड लंपास केली.

बुधवारी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी राकेश उपाध्ये यांची फिर्याद दिली. स्थानिक गुन्हेगारांनी पाळत ठेऊन चोरी केल्याचा संशय आहे. समडोळीत काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेज तपासणीचे काम सुरू आहे. या प्रकारानंतर काही तरुणांनी गावात गस्त घालण्याचे काम सुरू केले आहे.

हेही वाचा

Back to top button