सांगली : जि. प., पं. स. सदस्यांना सुटेना ग्रामपंचायतीचा मोह | पुढारी

सांगली : जि. प., पं. स. सदस्यांना सुटेना ग्रामपंचायतीचा मोह

सांगली; पुढारी वृत्तसेवा : सत्तेचा मोह भल्याभल्यांना आवरता आलेला नाही. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदारकी… असा राजकीय चढता क्रम मानला जातो. मात्र पंचायत आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ग्रामपंचायत निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. खुर्चीसाठी गाडी रिव्हर्स आल्याने गावागावांत उलटसुलट चर्चा होत आहे.

शासनाकडून लाखो रुपयांचा निधी थेट ग्रामपंचायतींना येत आहे. त्यामुळे सरपंच पदाला खूप महत्त्व आले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीचा सदस्य होण्यापेक्षा ग्रामपंचायतीचे मैदान मारू, असा निश्चिय करून अनेकजण ग्रामपंचायतीसाठी मैदानात उतरले आहेत.
वाळवा तालुक्यात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित पाटील हे कामेरीतून सरपंच पदासाठी मैदानात उतरले आहेत. तसेच बोरगाव येथील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जितेंद्र पाटील हेही सरपंचपदाचे उमेदवार आहेत. पंचायत समितीचे माजी सदस्य आनंदराव पाटील येडेनिपाणीत सदस्य पदासाठी, तर शंकर चव्हाण हे सुरूल येथे सरपंच पदासाठी उभे आहेत. पंचायत समितीच्या माजी सभापती शैलजा पाटील सरपंच पदासाठी मैदानात उतरल्या आहेत.

पलूस तालुक्यात माजी सभापती डॉ. मीनाक्षी सावंत या सावंतपूर येथे सरपंच पदासाठी उमेदवार आहेत. तसेच तासगाव तालुक्यातील चिंचणी येथे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सदाशिव माळी हे चिंचणीतून बिनविरोध झाले आहेत. तसेच विटा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राहुल साळुंखे हे कमळापूर येथून सरपंच पदासाठी मैदानात उतरले आहेत. काही पंचायत समितीचे आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्यांनी मुलगा, सून, पत्नीला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उतरवले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी घराणेशाही बघायला मिळत आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे सदस्य- सभापती, ग्रामपंचायत निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने गावागावात उलटसुलट चर्चा होत आहे. ग्रामपंचायतींना येणाऱ्या थेट निधीमुळे गाडी रिव्हर्स आल्याचे बोलले जाते.

निवडणुकीमुळे अनेकांची वेट अँड वॉचची भूमिका

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका अद्यापही झालेल्या नाहीत. गट आणि गणाची आरक्षण सोडत झाली आहे. मात्र या प्रक्रियेला शासनाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे आरक्षण सोडत पुन्हा होणार की निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होणार, याबद्दल तर्कविर्तक व्यक्त होत आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उमेदवारी मिळाली तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मैदानात उतरता येणार नाही, अशी भीती आहे. त्यामुळे अनेकांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे.

Back to top button