सांगली : विट्यात महिला ऑपरेटर जाळ्यात! | पुढारी

सांगली : विट्यात महिला ऑपरेटर जाळ्यात!

सांगली/विटा; पुढारी वृत्तसेवा : नॉन क्रिमिलेयर दाखल्याचे प्रकरण प्रांत कार्यालयात पाठविण्यासाठी सतराशे रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी विटा (ता. खानापूर) तहसील कार्यालयात नागरी सुविधा केंद्रातील ऑपरेटर महिलेसह तिच्या मुलाला लाच लुचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी पकडले. कार्यालयातच सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

महिला ऑपरेटर पूजा किशोर साळुंखे (वय 52) व प्रतीक किशोर साळुंखे (28, दोघे रा. सावरकरनगर, विटा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध विटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.

तक्रारदार विटा परिसरातील आहेत. त्यांच्या भावाचा नॉन क्रिमिलेयर दाखल काढायचा होता. यासाठी त्यांनी विटा तहसील कार्यालयातील सेतू कार्यालयात संपर्क साधला. दाखला काढून देण्याचे प्रकरण प्रांत कार्यालयात पाठविण्यासाठी ऑपरेटर पूजा साळुंखे हिने दोन हजार रुपये लाचेची मागणी केली. चर्चेअंती सतराशे रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली. या विभागाने तक्रारीची चौकशी केली. पूजा साळुंखे हिने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

लाचलुचपत विभागाने सापळा लावला. पूजा साळुंखे हिने लाचेची रक्कम मुलगा प्रतीक साळुंखे याच्याकडे देण्यास सांगितले. प्रतीकने लाचेची रक्कम घेताच त्याला रंगेहाथ पकडले. त्यानंतर पूजा साळुंखेलाही अटक करण्यात आली.

पोलीस उपअधीक्षक सुजय घाटगे, निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी, अंमलदार अविनाश सागर, संजय संकपाळ, सीमा माने, धनंजय खाडे, प्रितम चौगुले, अनिस वंटमुरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

वाचा : 

Back to top button