Anil Babar : ‘नाराजी’बाबत आमदार अनिल बाबर म्‍हणाले, “सत्तेसाठी मी…” | पुढारी

Anil Babar : 'नाराजी'बाबत आमदार अनिल बाबर म्‍हणाले, "सत्तेसाठी मी..."

विटा; पुढारी वृत्तसेवा : सत्ता स्थापनेच्या चार महिन्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या गटाच्या सर्व आमदारांना कामाख्या देवीच्या दर्शनासाठी विमानाने गुवाहाटीला घेऊन गेले आहेत. मात्र या दौऱ्याला शिंदे गटाचे तीन मंत्री आणि काही आमदार गेलेले नाहीत. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. विशेषतः आमदार बाबर यांच्याबाबत सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभुमीवर आमदार बाबर यांनी आज ( दि. २६ ) त्यांचे मत व्यक्त केले .

याचा अर्थ मी नाराज आहे असा होत नाही

आमदार बाबर म्हणाले की, “नाराजीचा विषय म्हटला तर तो विकास कामासाठी होऊ शकतो. सत्तेसाठी मी नाराज होणारा कार्यकर्ता नाही. लोकप्रतिनिधी असलो तरी मला सुद्धा भावना आहेत. आपल्या कौटुंबिक कारणास्तव हा दौरा आपण रद्द केला. सरकार स्थापनेच्या सगळ्या घडामोडीवेळी माझी पत्नी आजारी पडली होती. त्या आजारपणात तिचे निधन झाले. उद्या २७ नोव्हेंबर रोजी तिचा जन्मदिवस असल्या कारणाने घरगुती कार्यक्रम आहे. अशा परिस्थितीत भावनेचा प्रश्न निर्माण होतो. यामुळेच मी तिकडे गेलेलो नाही. या दौऱ्याला मी गेलो नाही याचा अर्थ असा होत नाही की मी नाराज आहे.त्यामुळे आपण गुवाहाटीला गेलो नाही.”

आमदार बाबर हे सत्ता बदल घडविण्यासाठी आणि शिंदे -फडणवीस यांचे सरकार आणण्यासाठी पहिल्या फळीतले आमदार ओळखले जातात. इतकेच नव्हे तर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या अपात्रतेच्या खटल्यामध्ये पहिल्या १६ आमदारांमध्ये बाबर यांचे नाव ११ वे आहे. ही वस्तुस्थिती पाहता मंत्रिमंडळाच्या पहिल्याच टप्प्यात आमदार बाबर यांना मंत्रिपद मिळणार याची खात्री त्यांच्यासह सर्व खानापूर मतदारसंघाला होती. विशेष म्हणजे मुख्यमंत्री शिंदे यांनी आमदार बाबर यांना याबाबतचे आश्वासन देखील दिले होते. परंतु आज अखेर बाबर यांच्यापासून मंत्रिपद दूरच राहिलेले चित्र पहायला मिळत आहे. सर्व पार्श्वभूमीवर आमदार बाबर हे गुवाहाटीला न गेल्यामुळे मतदारसंघांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू आहे.

मी राजकारणात अनेक वर्ष काम करत आहे. राजकीय परिस्थितीत कुठे जायला मिळाले अगर न मिळाले यापेक्षा समाजकारणाला महत्त्‍व देणारा मी माणूस आहे. लोकांच्या हिताला प्राधान्य देऊन काम करणारा हा लोकप्रतिनिधी असतो. नाराजीचा विषय म्हटला तर तो विकास कामासाठी होऊ शकतो सत्तेसाठी मी नाराज होणारा कार्यकर्ता नाही. मी जरी लोकप्रतिनिधी असलो तरी मला सुद्धा भावना आहेत. भावनिक स्तरावर काम करत असताना मलाही कौटुंबिक कार्यक्रमात हजेरी लावणे महत्त्वाचे ठरते.

हेही वाचा

Back to top button