सांगली : जतच्या विकासात बाळासाहेबांची शिवसेना सिंहाचा वाटा उचलेल – योगेश जानकर | पुढारी

सांगली : जतच्या विकासात बाळासाहेबांची शिवसेना सिंहाचा वाटा उचलेल - योगेश जानकर

जत, पुढारी वृत्तसेवा : गेल्या दोन दशकापासून जतचे राजकारण पाणी प्रश्ना भोवती फिरत आहे. अद्याप पाणी प्रश्न सुटलेला नाही. निवडणुका आल्या की पाण्यासह अन्य प्रश्न सोडवू असा आश्वासनांचा पाऊस पडतो पण निवडणुका संपल्या की पुन्हा पुढच्या निवडणुकीत तोच प्रश्न कायम असतो हा गावचा अनुभव आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील बाळासाहेबांची शिवसेना ही आश्वासने देण्यापेक्षा प्रत्यक्ष काम करण्यावर भर देणार आहे. जतच्या पाण्याचा, शिक्षणाचा, एमआयडीसीसह अन्य प्रश्न सोविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. बाळासाहेबांची शिवसेना जतच्या विकासात सिंहाचा वाटा उचलेल अशी ग्वाही नूतन संपर्क प्रमुख, ठाणे महानगर पालिकेचे माजी शिक्षण सभापती, विद्यमान नगरसेवक योगेश जानकर यांनी दिली.

जत येथे या पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना  जानकर म्ह‍‍णाले,” दुष्काळी भाग, पाणीप्रश्न मिटला पाहिजे यासाठी मुख्यमंत्री शिंदे सक्रीय आहेत. आजी, माजी आमदारांवर लोकप्रतिनिधीवर टीका, टिप्पणी न करता आपण कामातून सारे दाखवून देणार आहोत. जतचा पाणीप्रश्न तर सोडविणार आहे. त्याचबरोबर दुष्काळी तालुक्यात दर्जेदार व गुणवत्तापूर्वक शिक्षणावर अधिक भर असेल. या भागात आतापर्यत पंचतारांकित एमआयडीसी होणे अपेक्षित होते; पण ती नाही याची खंत वाटते. लवकरच राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, सचिवासोबत बैठक होईल. हा प्रश्न निकाली काढून नवनवीन रोजगारांची संधी निश्चित उपलब्ध होईल.”

आगामी काळात तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुका बाळासाहेबांची शिवसेना स्वबळावर लढेल असेही ते म्हणाले. बाळासाहेबांची शिवसेना वाढली पाहिजे यासाठी कार्यकर्त्यांना बळ दिले जाईल. आपण स्वतः गावोगावी पोहचणार असून गाव तेथे बाळासाहेबांची शिवसेना शाखा काढणार आहोत. तसेच संपर्क कार्यालय काढण्यात येणार आहेत. तालुक्यात प्रशासनाच्या अनेक तक्रारी आहेत याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देणार असून, लवकरच प्रशासनात बदल दिसेल असेही जानकर म्‍हणाले.

हेही वाचा

Back to top button