सांगली : कार्तिक पौर्णिमेचा चंद्र ग्रासलेल्या स्थितीत उगवणार

सांगली; पुढारी वृत्तसेवा : मंगळवारी सायंकाळी 5.56 ते 6.19 या वेळेत क्षितिजालगत खंडग्रास चंद्रग्रहणाचा आविष्कार पाहायला मिळणार आहे. कार्तिक पौर्णिमेचा चंद्र ग्रासलेल्या स्थितीत उगवणार आहे. चंद्रोदयानंतर 23 मिनिटांत हे चंद्रग्रहण संपणार आहे. शहरातील नागरिकांना इमारतीच्या टेरेसवरून अथवा एखाद्या उंच ठिकाणावरून हा आविष्कार पाहता येईल, अशी माहिती खगोल अभ्यासक एस. व्ही. शेलार यांनी दिली.
पृथ्वी प्रदक्षिणा करताना चंद्र जर पृथ्वीच्या सावलीतून गेला तरच चंद्रग्रहण घडते. पृथ्वीच्या दोन प्रकारच्या सावल्या अंतराळात पडलेल्या असतात. गडद सावली आणि विरळ सावली. पूर्ण चंद्रबिंब गडद सावलीतून गेले, तर ते पूर्णपणे ग्रासले जाऊन खग्रास चंद्रग्रहण घडते. जर पूर्ण चंद्रबिंब विरळ सावलीतून गेले, तर चंद्राचा प्रकाश अंशतः कमी होतो. पण चंद्रबिंब ग्रासलेले दिसत नाही. यावेळी छायाकल्प चंद्रग्रहण घडते. कधी कधी चंद्रबिंबाचा काही भाग गडद सावलीतून, तर काही भाग विरळ सावलीतून जातो. अशा वेळी चंद्राचा काही भागच ग्रासलेला दिसतो. या प्रकाराला खंडग्रास चंद्रग्रहण असे म्हटले जाते.
महाराष्ट्रात दि. 8 नोव्हेंबरला चंद्रोदय होईल. तेव्हा चंद्रबिंबाचा काही भाग पृथ्वीच्या गडद सावलीतून बाहेर पडलेला असून काही भागच ग्रासलेला दिसेल. ग्रहण मोक्षानंतर 6.19 ते 7.26 या वेळेत चंद्रबिंब विरळ सावलीतून प्रवास करेल. या काळात चंद्राचे तेज नेहमीच्या पूर्णबिंबाच्या तुलनेत कमी जाणवेल.
या अवस्थेला छायाकल्प म्हणतात. ही अवस्था 7.26 ला संपेल. तेंव्हा चंद्र विरळ सावलीतून बाहेर पडलेला असेल आणि ग्रहण वेधही संपतील. पौर्णिमेचा चंद्र नेहमीसारखा प्रकाशित दिसेल. नागरिकांनी ग्रहण अवश्य पाहावे. इतरांना दाखवावे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून या नैसर्गिक घडामोडींचा अभ्यास करावा, असे आवाहन शेलार यांनी केले आहे.