सांगली : 14.43 लाखांचे बनावट कीटकनाशक आष्ट्यात जप्त

सांगली : 14.43 लाखांचे बनावट कीटकनाशक आष्ट्यात जप्त

आष्टा; पुढारी वृत्तसेवा :  बागणी-बावची रस्त्यावर मंगळवारी दुपारी सांगली येथील जिल्हा गुण नियंत्रण विभाग व आष्टा पोलिसांनी संयुक्तपणे छापा टाकून 14 लाख 43 हजार 800 रुपयांची बनावट कीटकनाशके जप्त केली. याप्रकरणी आष्टा पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शशिकांत विलासराव थोरात (वय 45, रा कोटभाग वाळवा), बजरंग भूपाल माळी (42, रा. साखराळे रोड, कोरे मळा रा. वाळवा) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बागणी-बावची रस्त्यावर एका कारमध्ये हैदराबाद येथे बनविलेली बनावट कीटकनाशक विक्रीसाठी आणली असल्याची माहिती नवी दिल्ली येथील ट्रू बडी कन्सल्टिंग प्रा.लि.चे वरिष्ठ सहायक संघदीप खिराडे यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक सुरेंद्र पाटील यांना दिली. त्यानंतर निरीक्षक पाटील, खिराडे, प्रदीप शर्मा, आचल त्रिखा, वाळवा पं. स.चे कृषी अधिकारी संजय बुवा हे आष्टा पोलिस ठाण्यातील हवालदार एस. एस. काकतकर यांच्यासह घटनास्थळी पोहोचले. याठिकाणी पांढर्‍या रंगाची कार (एम.एच.09, बी. बी. 9739) उभी असलेली दिसली.

कारची तपासणी केली असता त्यामध्ये विक्रीसाठी आणलेली बनावट शेती औषधे, बुरशीनाशके, कीटकनाशके असे साहित्य आढळून आले. पोलिसांनी हे सर्व साहित्य जप्त केले. बजरंग माळी, चालक शशिकांत थोरात यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कीटकनाशके विकण्याचा कोणताही विक्री परवाना नव्हता. दोघांकडे मालबाबत चौकशी केली असता हा माल बसने हैदराबादहून मागवून माधवनगर येथील ट्रान्सपोर्ट कंपनीच्या गोडावूनमध्ये ठेवला होता. त्या ठिकाणाहून ताब्यात घेतल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी 14 लाख 43 हजार 800 रुपयांची सर्व बनावट कीटकनाशके जप्त केली. कीटकनाशकाचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. आष्टा पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news