सांगली : शिराळ्यात राजकीय मोर्चेबांधणीस वेग | पुढारी

सांगली : शिराळ्यात राजकीय मोर्चेबांधणीस वेग

शिराळा; विठ्ठल नलवडे :  शिराळा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी शहरातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. निवडणुकीचे पडघम लवकरच वाजणार आहेत. तर इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. इच्छुक मोठ्या संख्येने असल्याने नेते मंडळींची डोकेदुखी वाढली आहे.

सध्या नगरपंचायतीवर प्रशासक म्हणून मुख्याधिकारी योगेश पाटील काम पाहत आहेत. नगरपंचायत आरक्षण जाहीर झाले आहे. काही ठिकाणी इच्छुकांची दांडी गुल झाली आहे. यातून काही जणांचा हिरमोड झाला आहे. त्यांना प्रभाग बदलण्याची वेळ आली आहे. गेल्या निवडणुकीत सत्यजित देशमुख काँग्रेसमध्ये होते तर आता ते भाजपात आहेत. माजी मंत्री शिवाजीराव नाईक भाजपमध्ये होते ते आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. यामुळे आता निवडणुकीत कोण कोणाशी युती करणार आहेत हे ही महत्त्वाचे आहे.

दरम्यान, यावेळी नगराध्यक्षपद खुले झाल्याने इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून नगराध्यक्षपदासाठी तयारी सुरू केली आहे. नगराध्यक्षपदाचे आरक्षण खुले असल्याने शिराळा शहरात सर्व प्रभागात सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. अनेक इच्छुक उमेदवार आपली उमेदवारी निश्चित धरून तयारीस लागले आहेत.

शिराळा ग्रामपंचायतीवर सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. फक्त एक वर्ष काँग्रेसच्या ताब्यात गेली. नगरपंचायत झाल्यापासून नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस नाईक गटाचे वर्चस्व आहे.

शिराळा शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक – माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांचा गट, सांगली जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित देशमुख यांचा गट आणि महाडिक युवा शक्तीचे सम्राट महाडिक यांचा भाजप गट व चौथा शिवसेनेचा गट कार्यरत आहेत. भाजप, शिवसेना व काँग्रेसचे कार्यकर्ते नगरपंचायत निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत.

यावेळी भाजपाचे सम्राट महाडिक निवडणूक लढविणार आहेत. तर नगरपंचायत निवडणुकीसाठी इच्छुकांनी शक्तीप्रदर्शन करत नेत्याकडे जाणे-येणे वाढवले आहे. तसेच कार्यकर्त्यांच्या मार्फत नेत्यांपुढे आपलेच नाव कसे येईल या दृष्टीने डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे. काही असले तरी अनेक इच्छूक निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी तयारीला लागले आहेत. बहुतांशी गल्लीबोळातील अगदी सामान्यातील सामान्य तरुण मतदारांचे वाढदिवसही दिमाखात होऊ लागले आहेत. तसेच विविध कामाची उद्घाटने करणे, नागरिकांच्या गाठीभेटीवर भर देण्यासह चौकाचौकात पोस्टरबाजी करत वातावरण निर्मिती सुरू आहे.

इच्छुक उमेदवार तर आतापासूनच देव पाण्यात घालून बसले आहेत. आमदार नाईक यांनी गेल्या निवडणुकीत नगरपंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ता एकहाती आणली होती. शिराळा शहरात कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली. त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होणार आहे. तसेच गेल्या निवडणुकीत शिवाजीराव नाईक यांनी काही जागांवर विजय मिळवत आपले स्थान मजबूत केले आहे. सत्यजित देशमुख यांना एक ही जागा मिळाली नाही.
शहरात गेल्या पाच वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेच्या कार्यकाळात शहरात या पक्षाने महिला नगरसेवकांना नगराध्यक्षपदाचा मान दिला आहे. याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होणार आहे.

तालुक्यामध्ये सुरू असणार्‍या संभाव्य राजकीय मनोमिलनावर महाविकास आघाडीमधील असंतुष्ट कार्यकर्ता कोणती भूमिका घेणार हे देखील निवडणूक काळात महत्त्वाचे आहे. मागील निवडणुकीत माजी मंत्री नाईक यांच्याबरोबर युती केल्याच्या बदल्यात सम्राट महाडिक यांच्या गटाचे स्वीकृत सदस्य म्हणून नगरसेवक केदार नलवडे यांना संधी मिळाली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून विश्वप्रतापसिंग नाईक यांना संधी मिळाली. येणार्‍या निवडणुकीत सम्राट महाडिक व सत्यजित देशमुख यांना शहरातील अनेक नवीन चेहरे व माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची साथ मिळणार आहे.

कोण कोणाशी युती करणार….

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या चार गटामध्येच प्रामुख्याने होतात. गेल्या नगरपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत आमदार मानसिंगराव नाईक, जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित देशमुख आणि माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या गटामध्ये निवडणूक झाली होती. शिवाजीराव नाईक गटास सम्राट महाडिक गटाने सहकार्य केले होते. त्यामुळे सदर निवडणूक ही तिरंगी होती. यावेळी आमदार मानसिंगराव नाईक, शिवाजीराव नाईक राष्ट्रवादी काँग्रेस गट, सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक हे चार गट कोण कोणाशी युती करणार हे महत्त्वाचे आहे.

Back to top button