सांगली : स्वच्छतेचा बोर्‍या; रोगराईला निमंत्रण | पुढारी

सांगली : स्वच्छतेचा बोर्‍या; रोगराईला निमंत्रण

सांगली;  पुढारी वृत्तसेवा :  तुंबलेल्या गटारी, कचर्‍याने ओव्हरफ्लो कंटेनर, खासगी मोकळे प्लॉट तसेच पालिकेच्या खुल्या भूखंडांमध्ये माजलेले गवत, झुडुपे, साचलेले सांडपाणी आणि दुर्गंधी हा अनुभव महापालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी पहावयास मिळत आहे. स्वच्छता, साफसफाईचा बोर्‍या उडाल्याने रोगराईला निमंत्रण मिळत आहे.
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे क्षेत्रफळ 118 चौरस किलोमीटर आहे. एवढ्या मोठ्या क्षेत्राच्या स्वच्छता, साफसफाईची मदार दीड हजार सफाई कामगारांवर आहे. यामध्ये कायम कामगार तसेच बदली व मानधनी कामगारांचा समावेश आहे.

घरे, दुकानांमधील कचरा संकलन करण्यासाठी घंटागाड्या आहेत. हा कचरा कंटेनरमध्ये टाकला जातो. तिथून तो कचरा कॉम्पॅक्टरद्वारे कचराडेपोत नेला जातो. मात्र अनेक ठिकाणी कचर्‍याने भरलेले कंटेनर नियमितपणे साफ केले जात नाहीत. कंटेनर भरल्याने कचरा अस्ताव्यस्त पडलेला दिसून येतो. याठिकाणी कुत्र्यांसह मोकाट जनावरांचा वावर दिसून येतो. अनेक गटारी तुंबलेल्या आहेत. गटारांची साफसफाई नियमित होत नाही. रस्त्याकडेला माजलेले गवत आणि या गवतांमध्ये प्लास्टिकच्या पिशव्या दिसून येतात.

महापालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी मोकळ्या जागा, खासगी प्लॉट अस्वच्छतेची ठिकाणे बनली आहेत. अनेक ठिकाणी अशा मोकळ्या जागांमध्ये झाडेझुडपे वाढली आहेत. मोकाट कुत्री आणि डुकरे यांचा वावर असतो. सिव्हिल हॉस्पिटलच्या पाठीमागील मोकळ्या जागेत गवताचे आणि झुडपांचे साम्राज्य पसरले आहे. याठिकाणी साचलेल्या पाण्यावर हिरवा तवंग पसरला आहे. शामरावनगरसह महापालिका क्षेत्राच्या विस्तारीत भागात निचर्‍याअभावी पाण्याची मोठी तळी निर्माण झाली आहेत.

चालकांविना नव्या 43 घंटागाड्या पडून

कचरा संकलनासाठी 72 घंटागाड्या कार्यरत आहेत. याशिवाय नवीन 48 घंटागाड्या चालकांअभावी धूळखात पडून आहेत. कंटेनरमधील कचरा उचलून नेण्यासाठी 13 कॉम्पॅक्टर कार्यरत आहेत. गटारांमधील काढलेला गाळ वाहून नेण्यासाठी 12 टीपर आहेत. डंपर प्लेसर 8 आहेत. वाहने पुरेशी असली तरी सफाई कामगारांची संख्या मात्र अपुरी आहे. 48 घंटागाड्यांवर चालक नियुक्तीही तातडीने होणे गरजेचे आहे.

खासगी प्लॉटधारकांना दुसरी नोटीस : ताटे

महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे म्हणाले, सफाई कामगारांची संख्या पुरेशी नसणे हे दुखणे मोठे आहे. तरीही महापालिका क्षेत्रात साफसफाई स्वच्छतेचे काम प्रभावीपणे होण्यासाठी स्वच्छता निरीक्षक, मुकादमांना सूचना दिलेल्या आहेत. कंटेनरमधील कचरा उठाव नियमितपणे होत नसल्यास संबंधितांना आदेश देऊ. खासगी प्लॉट स्वच्छ करून घेण्यासाठी संबंधित प्लॉटधारकांना दुसर्‍यांदा नोटीस दिली जात आहे. या नोटिसीची गांभिर्याने दखल न घेतल्यास पंचनामा करून कायदेशीर कारवाई केली जाईल.

Back to top button