सांगली : वन्यप्राण्यांचे वर्षभरात 107 पशुधनांवर हल्ले

बिबट्या www.pudhari.news
बिबट्या www.pudhari.news
Published on
Updated on

शिराळा; विठ्ठल नलवडे :  शिराळ्यासह वाळवा तालुक्यात बिबट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. शिराळा तालुक्यात गेल्या वर्षात 107 पशुधनांवर बिबट्यांनी हल्ले केले आहेत. तालुक्यातील 92 गावांत बिबट्यांचे हल्ले तर गव्यांचा उपद्रव सुरू आहे. हल्ल्याचे सत्र सतत सुरूच आहे. यामुळे तालुक्यात ऊस तोडणी मजूर व शेतकर्‍यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चांदोली अभयारण्यातील अन्नसाखळी कमकुवत झाली आहे. त्यामुळे बिबटे अन्नाच्या शोधासाठी जंगलाबाहेर पडत आहेत. बिबट्याच्या हल्ल्यात दि. 22 फेब्रुवारी 2021 ला ऊस तोडणी मजुराचा मुलगा सुप्रियान शेख (वय 1) मृत्युमुखी पडला. 2016 मध्ये गव्याच्या हल्ल्यात काळुंद्रे येथील संभाजी उबाळे मृत्यूमुखी पडले. दि.28 ऑगस्टरोजी बिबट्याने कार्वे येथील गाईवर हल्ला करून ठार केले.
डिसेंबर 21 मध्ये कापरी येथील सुभाष तांदळे यांच्या 24 मेंढ्या तर मरळनाथपूर येथील सतीश थोरात यांच्या 11 मेंढ्या बिबट्यांच्या हल्ल्यात मरण पावल्या. अभयारण्यातील गवे सतत बाहेर पडत असल्याने शेतीचे नुकसान होत आहे.

प्रशिक्षित यंत्रणेचा अभाव

जिल्ह्यात सध्या बिबटे, गवे, मगर, लांडगे, तरस, हरणे, रानडुक्कर या हिंस्र प्राण्यांचे दर्शन आणि वावर नित्याचाच झाला आहे. चांदोली अभयारण्य परिसराला लगत असलेल्या शिराळा व वाळवा तालुक्यात सातत्याने बिवटे व गवे लोकांना दिसत आहेत. जंगलात पुरेसे भक्ष्य मिळत नसल्याने अन्नाच्या शोधात हे हिंस्त्र प्राणी जंगलाबाहेर पडू लागले आहेत. तालुक्यातील 92 गावांतील लोकवस्तीत वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. पण वनविभागाकडे प्रशिक्षित मनुष्यबळ, आधुनिक यंत्रणेचा अभाव आहे. शिराळ्याबरोबर वाळवा तालुक्यात वन्यप्राण्यांची दहशत वाढत चालली आहे. जंगलातून बाहेर पडलेल्या वन्यप्राण्यांना पकडून जंगलात सोडण्याची कोणतीच यंत्रणा व प्रशिक्षित मनुष्यबळ वन विभागाकडे नाही.

शेतीचे नुकसान, हल्ल्याची भीती

गवे, रानडुक्करे यांच्याकडून पिकांचे मोठे नुकसान होत आहे. माणसांवरही हल्ल्याचे प्रसंग घडले आहेत. या घटनांमुळे शेतकरी दहशतीखाली आहेत. वनविभागाने या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी लोकांतून होत असते. मात्र त्या परिसराला भेट देऊन पाहणी करणे व लोकांना प्रबोधन करणे या पलिकडे स्थानिक वनाधिकारी, कर्मचार्‍यांना कोणतेच अधिकार नाहीत.

प्राण्यांना पकडण्याचे अधिकारही नाहीत

सन 1972 च्या वन्यजीव कायद्यानुसार जंगलाबाहेर पडलेल्या या प्राण्यांना पकडण्याचे अधिकारही स्थानिक वन विभागाला नाहीत. हिस्त्र प्राण्यांनी मनुष्यावर हल्ला करून बळी घेतले तरच त्यांना पकडण्याची कायद्याने परवानगी मिळते. त्यासाठी सर्व पुरावे व कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. ही परवानगीही वन विभागाच्या नागपूर येथील कार्यालयाकडून मिळवावी लागते. एखादा जंगली प्राणी जखमी झाला तरच त्याच्यावर उपचार करण्यासाठी त्याला पकडण्याची परवानगी मिळते.

या सर्व किचकट प्रक्रियेमुळे जंगलाबाहेर वावरणार्‍या जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करण्यास वनविभागाचे हात बांधले आहेत. प्राण्यांना पकडण्याची वेळ आलीच तर तालुक्यातील वनविभागाकडे प्राण्यांना बेशुद्ध करण्यासाठीची आधुनिक शस्त्रे, चालविण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी, डॉक्टर तसेच सापळे अशा यंत्रणेची कमतरता आहे. त्यामुळे अशा प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाकडे प्रशिक्षित रेस्क्यू टीम तयार करून त्यांना आधुनिक शस्त्रे, सापळे पुरवणेही गरजेचे आहे.

बिबट्यांपासून बचाव करण्यासाठी वनखात्याने जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. तालुक्यातील 400 ऊस तोडणी टोळ्यांशी संपर्क साधून खबरदारी कशी घ्यावी, हे सांगितले आहे. तसेच ग्रामपंचायतींना, कारखाना यांना बिबट्यांपासून काय खबरदारी घ्यावी, याचे माहिती पट दाखवण्यात आले आहेत. बिबट्यांच्या हल्ल्यात मृत झाल्यास त्याचे त्वरित पंचनामे करून मदत देण्यात येते.
– सचिन जाधव, वनक्षेत्रपाल, शिराळा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news