सांगली : चैतन्यपर्वाचा जल्लोष; लक्ष्मीपूजन थाटात! | पुढारी

सांगली : चैतन्यपर्वाचा जल्लोष; लक्ष्मीपूजन थाटात!

सांगली; पुढारी वृत्तसेवा : आकाश उजळून टाकणार्‍या फटाक्यांची आतषबाजी, आकाशकंदिलांसह नेत्रदीपक विद्युत रोषणाई, सप्तरंगी रांगोळ्या, फुला-पानांच्या माळांनी सजलेले घरदार आणि नवीन कपडे परिधान करून परस्परांना शुभेच्छा देणारे आबालवृद्ध अशा उत्साही आणि आनंदी वातावरणात सोमवारी चैतन्यदायी दीपावली पर्वाचा जल्लोषात प्रारंभ झाला.

‘लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा होवो आपला सर्वांचा दिवाळी सण खास’… या व अशा शुभेच्छा देत सोमवारपासून दीपावली पर्व सुरू झाले. सोमवारी सायंकाळी लक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने चैतन्यपर्वाचा जल्लोष दिसून आला. लक्ष्मीपूजन धार्मिक विधीने व उत्साहात झाले. विद्युत रोषणाई व फटाक्यांच्या आतषबाजीने उत्साहाला उधाण आले होते.

दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण. दिवाळीत लक्ष्मीपूजनाचा दिवस सर्वात महत्त्वाचा मानला जातो. यादिवशी पहाटे लवकर उठून उटणे लावून स्नान केले जाते. उत्साही आणि धार्मिक वातावरणाने या दिवसाची सुरुवात झाली. सायंकाळी लक्ष्मीपूजन झाले. लक्ष्मीपूजनाची लगबग सर्वत्र दुपारपासूनच सुरू होती.

घरोघरी, कार्यालयांमध्ये फुलांची आकर्षक सजावट, रांगोळी, आरास, पणत्यांची सुबक मांडणी करून सायंकाळी लक्ष्मी देवीची धार्मिक विधीवत पूजा करण्यात आली. फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला. गेली दोन वर्षे सर्वत्र कोरोनाचे सावट होते. धार्मिक कार्यक्रम, सणांवरही निर्बंध होते. यावेळी मात्र दिवाळी सणावर कोरोनाची कसलीच छाया नव्हती. सर्वत्र उत्साही स्वरुप होते. दिवाळी सुरू होण्यापूर्वी आठवड्यापासून बाजारपेठेत गर्दी होती. लक्ष्मीपूजन हा दिवाळी सणातील तिसरा दिवस. पण या तिसर्‍या दिवशीही बाजारपेठेत सर्वत्र तोबा गर्दी होती. दिवाळी सणामुळे बाजारपेठेत नवीन रौनक दिसत आहे. सर्वत्र आनंद, उत्साह ओसंडून वाहत होता.

Back to top button