सांगली : अवैध धंदे मोडून काढणार – पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली | पुढारी

सांगली : अवैध धंदे मोडून काढणार - पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यातील सर्व प्रकारचे अवैध धंदे मोडून काढण्यात येतील. गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती नूतन पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

आ. सुरेश खाडे यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी जिल्ह्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे जाहीर करीत गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. खा. संजय पाटील यांनीही जिल्ह्यात अवैध धंदे वाढले असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यानंतर काहीच दिवसात मावळते पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांची बदली होऊन त्यांच्या जागी डॉ. तेली यांची नियुक्ती झाली. आज गेडाम यांच्याकडून डॉ. तेली यांनी पोलिस अधीक्षक पदाचा पदभार घेतला. यानंतर सायंकाळी ते पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले, माझी जळगाव, औरंगाबाद, पुणे, वर्धा, नागपूर या ठिकाणी कोकण विभाग वगळता इतर विभागात सेवा झाली आहे. या ठिकाणच्या अनुभवावर मी या ठिकाणी बेसिक पॉलिसी चांगल्या पद्धतीने होण्यासाठी प्रयत्न करणार आहे. गुन्हा घडल्यास तत्काळ त्याचा छडा लागून दोषीवर कारवाई होण्यासाठी प्रयत्न केले जातील. ‘पोलिस काका आणि पोलिस दीदी’ हा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येईल. पोलिसांची प्रतिमा सुधारण्यावर माझा भर राहील. लोकांच्यात सायबर व आर्थिक गुन्हे जनजागृतीसाठी मोहीम उघडण्यात येईल.

आर्थिक फसवणूक गुन्ह्यांचा छडा लावू

डॉ. तेली म्हणाले, जादा परतावा देण्याच्या आमिषाने आर्थिक फसवणुकीचे गुन्हे राज्यात सर्वत्र पहायला मिळत आहेत. या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात येईल. या प्रकरणाचे गुन्हे दाखल करून घेऊन छडा लावला जाईल. यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.

Back to top button