पलूस; पुढारी वृत्तसेवा : सोलर इन्स्टॉलेशनचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी 45 हजार रुपयांची लाच घेणार्या पलूस येथील वीज महावितरण कंपनीच्या दोन्ही अधिकार्यांच्या तासगाव व नवखेड (ता. वाळवा) येथील घरावर एकाचवेळी छापे टाकण्यात आले. दोन तास झडती घेण्यात आली.
महत्वाची कागदपत्रे सापडल्याने ते जप्त करण्यात आली असल्याचे पोलिस उपअधीक्षक सुजय घाटगे यांनी सांगितले. उपकार्यकारी अभियंता अतुल पेठकर (रा. तासगाव) याला 45 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. सहाय्यक अभियंता सागर चव्हाण (नवेखेड) यालाही अटक करण्यात आली होती. दोघांविरूद्ध पलूस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार यांनी पलूस येथील वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयात सोलर इन्स्टॉलेशनचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केला होता. ती फाईल मंजूर करण्यासाठी पेठकर व चव्हाण यांनी 45 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यामुळे तक्रारदाराने सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. विभागाने तक्रारीची चौकशी केली होती. यामध्ये त्यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते. बुधवारी दुपारी पेठकर व चव्हाणला पकडण्यात आले होते. त्यांना गुरुवारी न्यायालयात उभे करण्यात आले होते.
तत्पूर्वी पथकाने दोघांच्या घरावर एकाचवेळी छापा टाकून दोन तास झडती घेतली. महत्वाची कागदपत्रे सापडली. ती जप्त केली आहेत. दोघांच्या मालमत्तेची उघड व गोपनिय चौकशी केली जाणार आहे.
संशयित पेठकर व चव्हाण यांच्याविरूद्ध केलेल्या कारवाईचा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महावितरणच्या वरिष्ठ अधिकार्यांना सादर केला आहे. त्यामुळे या दोघांची खातेनिहाय चौकशी करून कारवाई होण्याची शक्यता आहे.