सांगली : सोयाबीन उत्पादकांची दिवाळी सुनीसुनीच! | पुढारी

सांगली : सोयाबीन उत्पादकांची दिवाळी सुनीसुनीच!

सांगली; विवेक दाभोळे : परतीच्या पावसाने सोयाबीनचे पीक अक्षरश: कुजले तर आहेच, शिवाय दरात मोठी घसरण झाली आहे. जिल्ह्यातील तब्बल 60 हजार हेक्टरमधील सोयाबीनचा अक्षरश: सुपडासाफ झाला आहे.

दोन वर्षांपूर्वी सोयाबीनला अभूतपूर्व उच्चांकी दर मिळाला. परिणामी सलग दुसर्‍या वर्षी जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र किमान 30 ते 35 टक्के वाढले. यावेळी तर तब्बल 60 हजार 500 हेक्टरमध्ये सोयाबीनचा पेरा झाला होता. मात्र, यावेळी विविध नैसर्गिक संकटांची मालिका जणू हात धुवून शेतकर्‍यांच्या मागे लागली. खरिपाच्या तोंडावर पावसाने मारलेली दडी, नंतर कमी अधिक पाऊस यातून कसेबसे पीक साधले; पण यलो मोझॅकने मोठाच दणका दिला. शिवाय गेल्या तीन आठवड्यापासून सुरू असलेल्या परतीच्या तुफानी पावसाने जेमतेम राहिलेल्या सोयाबीनची पुरती वाट लागली आहे. याच दरम्यान कशीबशी काढणी, मळणी केलेल्या सोयाबीनची बाजारात आवक सुरू झाली. या शेतकर्‍यांना कसाबसा 6 हजार रुपयांच्या घरात दर मिळाला. मात्र नंतर हाच आकडा आता 5 हजारांच्या घरात आला आहे. खरेदीदार व्यापारी यांनाच लाभाचे दान पडत आहे. देशभरात या हंगामात 118 लाख 45 हेक्टरवर लागवड झाली होती. मात्र, आता ऐन सोयाबीन काढणीच्यावेळी अतिवृष्टीसदृश अणि तांबेर्‍याचा, यलो मोझॅकचा सामना सोयबीनला करावा लागला. परिणामी उत्पादन घटले. एकरी उतारा 4 ते 5 क्विंटल कसाबसा मिळत आहे.

टप्प्याने विकणे हाच उपाय

काढणीनंतर बहुसंख्य शेतकरी लगेचच सायाबीन विकतात. काहीही झाले तरी सोयाबीन एकदम न विकता टप्प्याने विकणे हाच जादा दरासाठीचा उपाय असल्याचे या क्षेत्रातील जाणकार सांगतात.

शेतकर्‍यांची दिवाळी कडवटच

सोयाबीन हे हुकमी पैसा देणारे पीक; मात्र तयार सोयाबीन परतीच्या पावसाने अक्षरश: कुजले आहे, भिजलेले सोयाबीन वाया गेले आहे. सोयाबीनच्या पैशावरच अनेक शेतकर्‍यांची दिवाळी अवलंबून राहते. मात्र पीकच वाया गेल्याने शेतकरीवर्गाची दिवाळी सुनीसुनीच जात आहे. बाजारात देखील अपवादानेच शेतकरी खरेदीसाठी आलेला दिसतो.

एकरी उत्पादनात घट

वाळवा, शिराळा, पलूस आणि मिरज पश्चिम भागातील नदीकाठच्या सोयाबीनला अतिवृष्टी आणि पुराचा मोठा फटका बसला आहे. उरले सुरले पीक आहे त्याचा एकरी उतारा अत्यंत कमी कसाबसा 5 ते 6 पोती मिळू लागला आहे. एकरी सहा- सात क्विंटल घटीचा फटका बसला आहे.

उत्पादक अगतिक

जिल्ह्यात तब्बल 75 टक्क्यांहून अधिक शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. सोयाबीन काढणीनंतर या शेतकर्‍यांना तातडीने लगेचच उसाची लागण करायची असते. यासाठी बियाणे, खते हा खर्च असतो. परिणामी काढणी, मळणीनंतर सोयाबीनची मिळेल त्या दराने विक्री करणे त्याला भाग पडते. बहुतेक सर्वच शेतकरी सोयाबीन मिळेल त्या दराने विक्री करतात. यामुळे उत्पादित सोयाबीनमधील तब्बल 85 ते 90 टक्के सोयाबीन हे व्यापार्‍यांच्या हातात अत्यंत कमी दरात पडते.

Back to top button