ग्लोबल-वेफा फसवणूक प्रकरण : तक्रारीअभावी बोगस कंपन्यांचा तपास थंड | पुढारी

ग्लोबल-वेफा फसवणूक प्रकरण : तक्रारीअभावी बोगस कंपन्यांचा तपास थंड

सांगली; पुढारी वृत्तसेवा : गुंतवणूक रकमेला व्याज देण्याच्या आमिषाने सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणार्‍या एस. एम. ग्लोबल व वेफा मल्टिग्रेड या दोन कंपनीविरूद्ध तक्रारी देण्यासाठी गुंतवणूकदारांनी पुढे यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ग्लोबल व वेफा कंपनीविरूद्ध केवळ प्रत्येकी तीन या प्रमाणे केवळ सहाच तक्रारी दाखल झाल्या आहेत. गुंतवणूकदारांनी तक्रारी दाखल करण्यासाठी पुढे यावे, यासाठी पोलिसांनी अनेकदा आवाहन केले. मात्र प्रत्यक्षात कोणीच पुढे आले नाही. ग्लोबलचा मिलिंद गाडवे (रा. सांगलीवाडी) व वेफाचा विद्याधर ज्ञानेश्वर हिप्परकर (रा. गोंधळेवाडी, जत) हे सध्या तुरुंगाची हवा खात आहेत. त्यांनी जामीन मिळविण्यासाठी धडपड सुरू ठेवली आहे.

गाडवे व हिप्परकरने वेगवेगळी सांगलीत कार्यालय थाटून गुंतवणूक रकमेला दामदुप्पट परताना देण्याचे आमिष दाखवून फसवणुकीचे जाळे टाकले. त्यांनी 37 लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या तीन तक्रारी दाखल आहेत. वेफाच्या सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल आहे. ग्लोबलच्या केवळ गाडवेविरूद्ध गुन्हा दाखल आहे. गेल्या महिन्यात या दोघांना पुणे व कोल्हापूर येथील कारागृहातून ताब्यात घेतले होते. सहा-सात दिवस त्यांना पोलिस कोठडी मिळाली. दोन्ही गुन्ह्यांचा स्वतंत्र तपास झाला. या दरम्यान एकही नव्याने तक्रार दाखल झाली नाही. आर्थिक गुन्हे शाखेने दोघांच्या मालमत्ता शोधून काढल्या. संबंधित शासकीय कार्यालयातून या मालमत्तांवर टाच आणण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. नव्याने तक्रार दाखल झाली नसल्याने गुन्हे शाखेला पुढे काहीच तपास करता आला नाही. न्यायालयाने या दोघांची कारागृहात रवानगी केली. सांगली, कोल्हापूर व पुणे या तीन जिल्ह्यात गाडवेविरूद्ध गुन्हे दाखल झाले. सांगली जिल्ह्यात त्याने पाचशे कोटीहून अधिक रकमेचा गंडा घातल्याचा संशय आहे. हिप्परकरविरुद्ध कोल्हापूर जिल्ह्यातही गुन्हे दाखल आहेत.

सांगलीत नव्याने तक्रार दाखल होऊ नये, यासाठी गाडवे व हिप्परकरच्या समर्थकांचा गुंतवणूकदारांनी दबाव घेऊ नये. तक्रार केली तर पैसे मिळणार नाहीत, असा समज करून घेऊ नये. फसगत झालेल्या जिल्ह्यातील गुंतवणूकदारांनी अजूनही तक्रार दाखल करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन गुन्हे शाखेने केले आहे.

Back to top button