सांगली : 61 हजार शेतकर्‍यांना उद्या मिळणार प्रोत्साहन अनुदान | पुढारी

सांगली : 61 हजार शेतकर्‍यांना उद्या मिळणार प्रोत्साहन अनुदान

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  नियमित पीक कर्जाची परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना 50 हजारांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान गुरुवारी (दि. 20) जमा करण्यात येणार आहे. जिल्ह्यात प्रोत्साहन अनुदानासाठी 62 हजार 442 पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली होती.

जिल्हा मध्यवर्ती बँकेकडील 59 हजार 143 शेतकर्‍यांचा समावेश आहे. पात्र शेतकर्‍यांपैकी 61 हजार 281 शेतकर्‍यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. 1 हजार 261 शेतकर्‍यांचे आधार प्रमाणीकरण झालेले नाही, तसेच 455 शेतकर्‍यांच्या तक्रारी आहेत. आधार लिंक न झालेले आणि तक्रारी असलेल्या शेतकर्‍यांबाबतचा निर्णय बुधवारी (दि. 19) जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत होणार्‍या बैठकीत होणार आहे.

जिल्ह्यात 62 हजार 442 शेतकर्‍यांची यादी गुरुवारी प्रसिद्ध झाली होती. कर्जमुक्ती योजनेंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणार्‍याना प्रोत्साहन अनुदान योजना आधार प्रमाणीकरणवेळी ‘आधार क्रमांक अमान्य’ केलेल्या शेतकर्‍यांनी तक्रार निकाली काढण्याकामी त्यांच्या आधार क्रमांकाची स्व-साक्षांकित प्रत तत्काळ त्यांच्या गावातील विविध कार्यकारी संस्थेचे सचिव किंवा संबंधित तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयात जमा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. आधार प्रमाणीकरणाची मुदत मंगळवारी संपली. त्यामध्ये 61 हजार 281 शेतकर्‍याचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले. त्यांचे प्रमाण 98.50 टक्के आहे.

अद्यापही 1 हजार 361 शेतकर्‍यांचे आधार प्रमाणीकरण झालेले नाही. याशिवाय 455 शेतकर्‍यांच्या तक्रारी आहेत. आधार प्रमाणीकरण न झालेल्या तसेच तक्रारी जिल्हास्तरीय समिती निकाली काढणार आहे. तक्रार निकाली निघाल्याशिवाय प्रोत्साहन अनुदानाची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होणार नाही. त्यामुळे 1 हजार 361 शेतकर्‍यांच्या प्रोत्साहन अनुदानाबाबतचा बुधवारी निर्णय होईल.

Back to top button