सांगली : मिरजेसह जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी | पुढारी

सांगली : मिरजेसह जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  सांगलीसह मिरज, वाळवा, पलूस, आटपाडी तालुक्यासह जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी पावसाने हजेरी लावली. काही भागात मध्यम तर अनेक भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.

सांगलीत दुपारपर्यंत उन होते. तीनच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. सुमारे पंधरा मिनिटे चांगला पाऊस झाला. या पावसामुळे शहरात विविध भागात बसलेल्या विक्रेत्यांची तारांबळ उडाली. सखल भागात दलदल झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना गाडी चालवताना कसरत होत आहे. अचानक आलेल्या पावसामुळे काही विक्रेत्यांच्या वस्तू भिजल्याने नुकसान झाले. तसेच रात्री सातच्या सुमारास जोरदार सरी कोसळल्या.

सांगलीसह जिल्ह्यात पुढील दोन दिवस ठिकठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Back to top button