दै. ‘पुढारी’तर्फे ‘जागर स्वावलंबी शिक्षणाचा’ उपक्रम उत्साहात | पुढारी

दै. ‘पुढारी’तर्फे ‘जागर स्वावलंबी शिक्षणाचा’ उपक्रम उत्साहात

सांगली;  पुढारी वृत्तसेवा :  थोर शास्त्रज्ञ, माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस (15 ऑक्टोबर) हा महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्यावतीने दरवर्षी वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिनाचे औचित्य साधून दै. ‘पुढारी’तर्फे ‘जागर स्वावलंबी शिक्षणाचा’ या उपक्रमाचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण जिल्हाभर उपक्रमास शाळांमधून उदंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या शाळा आणि दै. पुढारी यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात बहुतांश शाळांनी सहभाग नोंदविला होता. सकाळी प्रत्येक शाळेच्या एका विद्यार्थ्याने दै. ‘पुढारी’ अंकाचे वाटप करत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्वावलंबी शिक्षणाचा वसा आणि वारसा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. काही शाळांमध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांची सायकल सजवून व अब्दुल कलाम यांची व्यक्तिरेखा साकारण्याबरोबरच वेशभूषा करून वृत्तपत्राचे वाटप केले. काही शाळेमध्ये रांगोळी काढून तसेच विविध सजावट करून वेगवेगळेपण जपत हा उपक्रम साजरा करण्यात आला.

 

सोशल मीडियावर व्हिडीओ धुमाकूळ

जिल्ह्यातील सर्वच शाळांमध्ये ‘स्वावलंबी शिक्षणाचा जागर’ व दै. ‘पुढारी’चा वाचकोत्सव साजरा करण्यासाठी विद्यार्थ्यांसह शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले होते. शाळांनी सुरू केलेल्या या नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती देणारे व्हिडीओ व फोटो सकाळपासूनच ‘पुढारी’च्या संकेतस्थळावर पाठवण्यात येते होते. तसेच सोशल मीडियावरही अपलोड केले जात होते. आलेल्या व्हिडीओ व फोटोमधील सर्वोत्कृष्टची निवड करून संबंधितांचा लवकर गौरव करण्यात येणार आहे.

शाळेत वाचला दै. ‘पुढारी’

शाळांनी आपल्या परिसरातील वृत्तपत्र विक्रेत्यांशी संपर्क साधून दै. ‘पुढारी’च्या अंकांची मागणी मोठ्या प्रमाणात शुक्रवारी नोंदविली होती. शनिवारी अंकांचे वाचन शाळांमध्ये केले. याशिवाय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी ‘वाचक प्रेरणा दिना’चा उपक्रमही राबविण्यात आला आहे.

गावागावात काढली प्रभातफेरी

अनेक गावांत विद्यार्थ्यांनी डॉ. अब्दुल कलाम यांची वेशभूषा साकारून गावात प्रभातफेरी काढली.

 

 

Back to top button