

देवराष्ट्रे; पुढारी वृत्तसेवा : आजकाल मोबाईल किंवा टीव्हीमध्ये रमून गेलेल्या मुलांना अभ्यासाला बसविणे म्हणजे पालकांसाठी एक दिव्य आहे. पण सांगली जिल्ह्यातील मोहित्यांचे वडगाव असे एक गाव आहे की, सायंकाळी 7 वाजले की, या गावातील झाडून सगळी शालेय आणि महाविद्यालयीन मुले अभ्यासाला बसतात. जवळपास दोन तास जागचे कुणी हलतही नाहीत. या उपक्रमाची आजकाल राज्य आणि देशपातळीवरही दखल घेतली जाऊ लागली आहे.
सांगली जिल्ह्याच्या कडेगाव तालुक्यातील मोहित्यांचे वडगाव या गावात मागील दोन महिन्यांपासून हा उपक्रम सुरू झाला आहे. हा उपक्रम सुरू होण्याची कारणेही तशी सर्वांसाठीच चिंतनीय आहेत. मध्यंतरी आलेल्या कोरोनामुळे जवळपास दोन वर्षे मुले शाळेतच जाऊ शकली नव्हती. सगळे काही ऑनलाईन. त्यामुळे गावातील झाडून सगळ्या मुलांच्या हातात बघेल तेव्हा मोबाईल दिसायचा. शालेय आणि महाविद्यालयीन मुले जणू काही या मोबाईलच्या आहारीच गेली होती, खाता-पिता, उठता-बसता नुसता मोबाईल, मोबाईल आणि मोबाईल! घराघरातील आयाबाया पोरांच्या या मोबाईल वेडाने पुरत्या हैराण झाल्या होत्या. गावातील महिलांच्या या त्रासाला वाचा फुटली ती गावच्या ग्रामसभेत!
14 ऑगस्ट 2022 रोजी मोहित्यांचे वडगाव या गावाची ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेमध्ये महिलांनी मुले मोबाईल व टीव्हीच्या आहारी गेल्यामुळे त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाल्याने शैक्षणिक गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केले. यावर सरपंच विजय मोहिते यांनी सायंकाळी 7 ते 8.30 वाजेपर्यंत गावातील प्रत्येक घरातील टीव्ही आणि मोबाईल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला महिलांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यासाठी सायंकाळी 7.30 वाजले की गावच्या मंदिरावरील स्पीकरवरून भोंगा वाजवण्याचे ठरले.
ठरल्याप्रमाणे दुसर्या दिवसापासून गावात या उपक्रमाला सुरुवात झाली. सरपंच मोहिते यांनी सकाळीच स्पीकरवरून ग्रामस्थांना या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली.त्यानंतर सायंकाळी 7 वाजता भोंगा वाजवून गावातील काही ज्येष्ठ मंडळींनी गावातून पायी फिरून प्रबोधन फेरी काढून झाडून सगळ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाला बसविले. जवळपास दोन महिने झाले, गावात हा उपक्रम सुरू असून आता मुलांना याची सवयच झाली आहे. सायंकाळी 7 वाजता मुले स्वत:हून अभ्यासाला बसत असतात. घरातील महिलाही टीव्ही आणि मोबाईल बंद करून मुलांना अभ्यासात मदत करताना दिसतात. यामुळे काही दिवसांतच गावातील मुलांची शैक्षणिक प्रगती झाल्याचे दिसून येत आहे. सध्या या उपक्रमाची आंतरराष्ट्रीय माध्यमांसह देशातील दिग्गज नेत्यांनी दखल घेतली आहे. सोशल माध्यमांवर देशातील तरुण पिढी अक्षरश: आपला वेळ वाया घालवत असताना या गावाने घेतलेला निर्णय इतर गावांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
सायंकाळी 7 ते 9 च्या दरम्यान टीव्हीवर वेगवेगळ्या मालिकांचा जणू काही रतीबच सुरू असतो. काल्पनिक मालिकांमध्ये ग्रामीण भागातील महिला अक्षरश: वाहून गेल्या आहेत. त्यामुळे त्यांचे मुलांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले आहे. शैक्षणिक गुणवत्ता ढासळलेली आहे. त्यामुळे गावातील महिलांनी या निर्णयाला उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे. या निर्णयाचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. देशातील प्रत्येक गावाने असा निर्णय घेतल्यास भविष्यात विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार असल्याचे सरपंच विजय मोहिते यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना सांगितले.