सांगली: आमच्यावरच उलटणाऱ्यांना जागा दाखवू : गोपीचंद पडळकरांचा अनिल बाबरांना इशारा | पुढारी

सांगली: आमच्यावरच उलटणाऱ्यांना जागा दाखवू : गोपीचंद पडळकरांचा अनिल बाबरांना इशारा

विटा: पुढारी वृत्तसेवा : आमची मदत घेऊन आमच्यावरच उलटणाऱ्यांना योग्य वेळी नक्की जागा दाखवून देईन, असा इशारा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार अनिलराव बाबर यांना जाहीरपणे दिला. पडळकर यांच्या या विधानामुळे राज्यात एकत्र आलेल्या भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या महायुतीला खानापूर विधानसभा मतदारसंघात मात्र वादाची ठिणगी पडण्याची शक्यता व्‍यक्‍त हाेत आहे.

सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या सत्कारानिमित्त विटा शहर भाजप आणि खानापूर तालुका भाजपच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पडळकर बोलत होते. प्रमुख उपस्थिती म्हणून नाव असूनही या कार्यक्रमाला खासदार संजय पाटील आलेच नाहीत. तर एकूणच रागरंग पाहून उपस्थित असूनही जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी न बोलणे च पसंत केले. मात्र, ज्यांची भाषणे झाली, त्यात शिंदे गटाचे बाबर आणि भाजपचे पडळकर या दोन आमदारांत चांगलीच शाब्दिक चकमक झाली. महाविकास आघाडीच्या काळात भाजपचे बहुतांश नेते आणि सेनेचे आमदार बाबर यांच्यात वेगवेगळ्या कारणामुळे दुरावा निर्माण झाला. यात प्रामुख्याने आमदार गोपीचंद पडळकर, खासदार संजय पाटील आणि माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख यांचा समावेश आहे. त्याचीच झलक या कार्यक्रमात दिसून आली.

गेल्या काही वर्षांपासून खासदार संजय पाटील आणि आमदार अनिलराव बाबर यांच्यात यशवंत साखर कारखान्यावरून वाद विकोपाला गेला आहे. तर २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत मदत करूनही माजी आमदार राजेंद्र आण्णा देशमुख यांचा आमदार बाबर यांचे शिष्य तानाजी पाटील यांनी जिल्हा बँक संचालक पदासाठी केलेला पराभव आणि याच कारणावरून आमदार पडळकरांच्यावर झालेला प्राणघातक हल्ला हे या वादाचे मूळ कारण ठरले आहे.

२०१९ च्या वेळी जी आमची चूक झाली : पडळकर

या कार्यक्रमात विटा शहर अध्यक्ष अनिल बाबर यांनी आपण विटा पालिकेच्या निवडणुकीसाठी आमदार बाबर गटाबरोबर युती करण्याचे पूर्वीच जाहीर केल्याचे सांगितले. परंतु आमदार पडळकर यांनी विटा शहराध्यक्ष अनिल बाबर यांच्या कामाचे कौतुक करताना तुम्ही आता कोणाच्या तरी वळचणीला जावू नका. या गावाचे नेतृत्व तुम्ही करा, असा जाहीर सल्ला देत आपण ताकदीने मदत करु, असे आश्वासन दिले. तसेच खानापूर विधानसभा मतदारसंघात अनेक अडचणी आणल्या जात आहेत. २०१९ च्या वेळी जी आमची चूक झाली, ती चूक आता २०२४ ला दुरूस्त करेन आणि ती वरिष्ठांना सांगून दुरूस्त करणार असल्याचे जाहीरपणे सांगून पडळकर यांनी बाबर यांना आपला विरोध असल्याचे स्पष्ट केले.

कोणत्या ठिकाणी काय बोलायचे याचे मला भान : आमदार बाबर

यानंतर आमदार बाबर बोलण्यास तयार नव्हते. परंतु संयोजकांनी खूप आग्रह केल्यानंतर आमदार बाबर यांनी हा सत्काराचा कार्यक्रम आहे. कोणत्या ठिकाणी काय बोलायचे याचे मला भान आणि संस्कार आहेत, असे सांगून पडळकरांना टोला लगावला. त्यावर पालकमंत्री खाडे यांनी आम्ही राज्यात एकजीवाने काम करत आहोत. यापुढेही सर्वच निवडणुकांत एकत्रित काम करू, असे सांगत ही शाब्दिक चकमक काहीअंशी विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु, शिंदे गट आणि भाजपमध्ये पुढील काळात संघर्ष उफाळून येण्याची स्पष्ट चिन्हे या कार्यक्रमातून दिसून आली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button