सांगली : पावसाने पिकांत पाणी; डोळ्यात अश्रू | पुढारी

सांगली : पावसाने पिकांत पाणी; डोळ्यात अश्रू

सांगली;  पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असणार्‍या मुसळधार पावसामुळे ऊस, द्राक्षासह खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पिके पाण्यात गेल्याने शेतकर्‍यांच्या डोळ्यात अश्रू आले आहेत. नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करुन भरपाई देण्याची मागणी होत आहे.

जिल्ह्यात खरीप पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. भुईमूग, सोयाबीन या पिकांची काढणी, कापणी प्रामुख्याने ऑक्टोबर महिन्यात होत असते. मात्र नेमक्या याच कालावधीत जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळला आहे. परिणामी बहुसंख्य ठिकाणी पिके शेतातच आडवी झाली आहेत. पाणी साचून राहिल्याने पिके कुजण्याच्या मार्गावर आहेत. अनेक ठिकाणी भुईसपाट झालेल्या या पिकांमुळे हाततोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी निराश झाला आहे. ज्याच्या जीवांवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचे नियोजन केले होते, ते पिकेच आज राहिले नसल्याने संसाराचा गाडा चालवायचा कसा, कर्जाच्या हप्ते भरायचे कसे, असे अनेक प्रश्न शेतकर्‍यांसमोर उभे झाले आहेत.

भाजीपाला कुजला

कृष्णा, वारणा पट्ट्यात मोठ्या प्रमाणात वांगी, बटाटा, दोडका, टोमॅटो, मेथी, कोथिंबीर, अशा विविध प्रकारचा भाजीपाला करण्यात येतो. भाजीतून येणार्‍या उत्पन्नावर या भागातील शेतकर्‍यांचे आर्थिक गणित अवलंबून असते. मात्र दोन दिवस झालेल्या पावसाचे पाणी भाज्यात साचून आहे. त्यामुळे अनेक भागातील भाज्या आता कुजू लागल्या आहेत. त्यामुळे उत्पादक चिंताग्रस्त झाले आहेत. तसेच द्राक्ष बागेत फळछाटणी होऊन घड बाहेर पडलेल्या तसेच फ्लॉवरींगच्या टप्प्यात असणार्‍या अनेक एकरातील द्राक्षबागांत रोगाचे सावट घोंगावून लागले आहे. अद्यापही 55 ते 60 टक्के क्षेत्रावरील बागांच्या छाटण्या झालेल्या नाहीत. ढगाळ वातावरण आणि पाऊस यामुळे द्राक्ष बागा उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त होत आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी झालेल्या नुकसानीचे गांभिर्याने दखल घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. गावागावात असणार्‍या कृषी सहाय्यकांमार्फत नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन भरीव आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी मंत्री खाडे यांनी प्रयत्न करण्याची मागणी शेतकर्‍यांतून होत आहे.

Back to top button