जत : द्राक्ष बागांची छाटणी मंदगतीने सुरू; बदलते हवामान आणि पावसामुळे शेतकरी संभ्रमावस्थेत | पुढारी

जत : द्राक्ष बागांची छाटणी मंदगतीने सुरू; बदलते हवामान आणि पावसामुळे शेतकरी संभ्रमावस्थेत

जत ; विजय रुपनूर: तालुक्यात गेल्या तीन वर्षापासून द्राक्षबागादारांना अनेक नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागत आहे. उत्पादित शेतीमालास योग्य हमीभाव न मिळाल्यामुळे शेतकरी वर्ग अर्थिक संकटात सापडलेला आहे. दरम्यान राज्यातील हवामान तज्ज्ञांकडून पुढील चार महिने मान्सून पावसाबद्दल कोणतेही ठोस अंदाज देण्यात येत नाहीत. हवामान अंदाज आणि मान्सूनविषयी विसंगत माहिती प्रसार माध्यमे आणि सोशल मीडियाद्वारे प्रसारित केली जात आहे. सध्या (ऑक्टोंबर महिन्यात) द्राक्ष बागा छाटणीचा कालावधी असतानासुद्धा द्राक्ष बागांची छाटणी ही मंदगतीने सुरू आहे. त्यामुळे द्राक्ष बागांची छाटणी करण्याबद्दल अनेक शेतक-यामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

तालुक्यात ऊस शेती बरोबर, डाळिंब, ड्रॅगन फ्रुट, आंबा या फळ पिकांचे उत्पादन घेतले जाते. बिळूर, उमराणी, डफळापूर येथे द्राक्षे मोठ्या प्रमाणात पिकवली जातात. गेल्या तीन-चार वर्षांपासून द्राक्ष बागायतदार मोठ्या अडचणीत सापडला आहे. गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे फार मोठा फटका द्राक्ष बागायतदारांना बसला आहे. याच कालावधीत बाजारपेठ उपलब्ध नसल्याने व्यापाऱ्यांनी याचा गैरफायदा घेत, शेतकऱ्यांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली आहे. अशा अनेक तक्रारी नोंद झाल्या आहेत. त्याचबरोबर गत वर्षी पीक छाटणीवेळी अवकाळी पाऊस सुरूच असल्याने, द्राक्ष पिक व्यवस्थित आलेले नाही.

बदलत्या खराब हवामानामुळे दावण्या, बुरशी, करप्या रोगांचा प्रादुर्भाव देखील वाढला असून, उत्पादनात घट होणार असल्याची शक्यता यावर्षीही वर्तवली जात आहे. शेतकऱ्याने अनेक संकटावर मात करून माल काढला, परंतु तिथेही व्यापारी व दलालांकडून मोठ्या प्रमाणावर लुबाडणूक झाली आहे. आर्थिक नुकसान, सोशल मिडीयाद्वारे पसरविण्यात येणारा विसंगत हवामान अंदाजामुळे द्राक्ष बागायतदार द्विधा मनस्थितीत आहेत.

ऑक्टोबरमध्येच बागांच्या छाटण्या कराव्यात

तालुक्यात द्राक्षलागवडीचे प्रमाण वाढत आहे. परंतु गेल्या दोन वर्षात कोरोनासह कमी दर व हवामानाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. उमदी परिसरात द्राक्षांची छाटणी सुरू आहे. त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यात देखील छटणी सुरू आहे. परंतु बदलत्या हवामानाच्या संभाव्य धोक्यामुळे शेतकऱ्यांत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत छाटणी केल्यास मार्च महिन्यात बेदाण्यासाठी द्राक्ष तयार होणे अपेक्षित आहे, कारण या काळात बेदाण्यासाठी योग्य तापमान असते.

राज्य द्राक्ष बागायतदार संघ व राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राकडून योग्य मार्गदर्शन द्राक्ष बागायतदारांना योग्य मार्गदर्शन दिले जाईल. तरी तालुक्यातील सर्व द्राक्ष द्राक्षबागायतदारांनी सोशल मीडियावरून पाठविण्यात येणा-या हवामान अंदाजाविषयीची कोणतीही भिती मनात न बाळगता वेळेवर म्हणजेच ऑक्टोबर महिन्यातच द्राक्ष बागांच्या छाटण्या कराव्यात, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
-विठ्ठल चव्हाण ,(उमदी) संचालक महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ

Back to top button