सांगली : आष्टा बनले अवैध व्यवसायांचे केंद्र | पुढारी

सांगली : आष्टा बनले अवैध व्यवसायांचे केंद्र

आष्टा; पुढारी वृत्तसेवा :  आष्टा शहर व परिसरातील अनेक गावे वाळवा तालुक्यातील अवैध व्यवसायाची प्रमुख केंद्रे बनली आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसाय बंद न झाल्यास गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचा इशारा दिला आहे.तरीदेखील आष्टा शहर व परिसरात अवैध व्यवसाय सुरूच आहेत.

आष्टा पोलिस ठाण्याच्या अंतर्गत 24 गावांचा समावेश आहे. आष्टा शहराबरोबरच परिसरातील अनेक गावात बनावट दारू, मटका, मावा, गुटखा, पत्त्यांचा जुगार, व्हिडीओ गेमचा जुगार, बेकायदेशीर प्रवासी वाहतूक, खासगी सावकारी, खनिज संपतीचे उत्खनन, गुंडगिरीसह अनेक अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू आहेत.आष्टा शहर व परिसरातील अनेक गावातील चौका-चौकात मोक्याच्या ठिकाणी शाळा महाविद्यालयांच्या परिसरात अवैध दारू, मटका, जुगार, व्हिडीओ गेम राजरोसपणे सुरू आहेत. अल्पवयीन मुलांपासून, युवक व सर्वसामान्य गोरगरीब लोक यामध्ये गुरफटले आहेत. अनेक विद्यार्थी शाळा, महाविद्यालये सोडून व्हिडीओ गेम, मटका, जुगार खेळताना दिसून येत आहेत. परंतु यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.

व्यसनाधीनता वाढलेली असल्यामुळे आष्टा व परिसरातील अनेक हॉटेल व ढाब्यावर बेकायदेशीररित्या बनावट दारूची राजरोसपणे विक्री सुरू आहे. निवडणुकांचा हंगाम जवळ येत असल्यामुळे शाळा, महाविद्यालयीन युवकांसह अनेकांची वर्दळ या ठिकाणी वाढलेली आहे. गुन्हेगारांचा रोजचाच वावर दिसत असून ही ठिकाणे गुन्हेगारांची आश्रयस्थाने बनली आहेत.

खासगी सावकारी बरोबरच दगड, माती, मुरूम, खडी याची अवैध खनिज तस्करी, स्टोन क्रेशर तर आजपर्यंत कोणीच रोखू शकले नाही.उलट ही तस्करी रोखणार्‍या महसूल कर्मचार्‍यांच्या अंगावर डंपर घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न झाला. तरीदेखील महसूल प्रशासन ही अवैध खनिज तस्करी थांबवू शकले नाही.

Back to top button