सांगली : तासगाव तालुक्यात सरासरीच्या 108 टक्के पाऊस | पुढारी

सांगली : तासगाव तालुक्यात सरासरीच्या 108 टक्के पाऊस

तासगाव; दिलीप जाधव :  सप्टेंबरअखेर तासगाव तालुक्यात दरवर्षी पडणार्‍या सरासरी पावसाच्या 108 टक्के पावसाची नोंद झाली आहे. तासगाव शहरासह तालुक्यात सर्व मंडलांमध्ये झालेल्या समाधानकारक पावसाने येरळा आणि अग्रणी नदीसह छोटे-मोठे ओढे-नाले वाहते झालेले आहेत. तालुक्यात पुणदी वगळता इतर तलाव शंभर टक्के क्षमतेने भरलेले आहेत. पाणीपातळी वाढल्याचा फायदा रब्बी हंगामी पिकांसह द्राक्ष, ऊसशेतीला होणार आहे.

पावसाळ्याच्या सुरुवातीला जूनमध्ये पावसाने हुलकावणी दिली होती. जूनअखेरीस तालुक्यात सरासरी पावसाच्या 28 टक्के पावसाची नोंद झाली. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये तासगाव शहरासह ग्रामीण भागाला पावसाने झोडपून काढले. तासगाव, मणेराजुरी व मांजर्डे मंडलामध्ये सरासरीच्या 90 टक्केपेक्षा जास्त पाऊस पडला. सावळज, विसापूर, येळावी मंडलात सरासरीच्या 100 टक्के पेक्षा जास्त पाऊस झाला. सावळज मंडलातील गावांना सर्वाधिक पाऊस झाला. सप्टेंबरअखेर या मंडलामध्ये तब्बल 651 मिलिमीटर पाऊस झाला. हा पाऊस सप्टेंबरअखेर मंडलातील सरासरीच्या 167 टक्के एवढा आहे. शनिवारी एका दिवसात सावळज मंडलात 55 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आजअखेर सावळज मंडलामध्ये 706 मिलिमीटर पाऊस झाला आहे.

सप्टेंबर अखेरचा तालुक्यातील मंडल निहाय पाऊस

मंडल सरासरी पाऊस
तासगाव 384 मिलीमीटर
मणेराजुरी 353 मिलीमीटर
सावळज 651 मिलीमीटर
विसापूर 398 मिलीमीटर
येळावी 396 मिलीमीटर
मांजर्डे 348 मिलीमीटर

Back to top button