सांगली: गोपीचंद पडळकर-संजय पाटील यांच्यातील संघर्षाला पूर्णविराम | पुढारी

सांगली: गोपीचंद पडळकर-संजय पाटील यांच्यातील संघर्षाला पूर्णविराम

आटपाडी; पुढारी वृत्तसेवा : सांगली लोकसभा निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकलेले आमदार गोपीचंद पडळकर आणि खासदार संजयकाका पाटील यांच्यातील टोकाचा राजकीय संघर्ष आणि दुराव्याला अखेर तिलांजली मिळाली आहे. तालुक्याचे युवा नेते अनिल पाटील यांच्या पुढाकाराने पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त आटपाडी येथे आयोजित कार्यक्रमास संजय पाटील यांनी उपस्थिती लावत आमदार व खासदारांनी हा दुरावा संपवला. तसेच जिल्ह्याच्या आणि आटपाडीच्या विकासाला चालना देण्याची ग्वाही दिली.

यावेळी अनिल पाटील म्हणाले की, मी संजय पाटील आणि पडळकर यांचा कार्यकर्ता आहे. दोघांनी एकत्र यावे अशी तळमळ होती.  आता दोघे एकत्र आल्याने विकासाचे नवे पर्व सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त करतो.

खासदार संजय पाटील म्हणाले, राजकारणात कोणी कायमचा शत्रू आणि मित्र नसतो. राजकारण करताना पुढे जाताना राजकीय संघर्ष झाला; पण आता आपण सर्वांनी एकत्र येऊन सामान्य जनतेचा विकास व्हावा, ही भूमिका घेऊन काम करू. धनगर समाजातील नेतृत्वाची पोकळी गोपीचंद पडळकर यांनी भरून काढली आहे. राज्यात गतिमान नेतृत्व करणाऱ्या पडळकर यांना भविष्यात त्यांच्या राजकीय आकांक्षा पूर्ण व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी पडळकर यांना शुभेच्छा दिल्या.

नवीन पुणे – बंगळूर हायवेमुळे प्रगतीचे दालन खुले होईल. आटपाडी तालुक्यातील जनतेला पाणी देण्याचे स्वप्न विस्तारित टेंभू योजनेद्वारे लवकरच साकारेल. माणगंगा साखर कारखाना सुरू व्हावा म्हणून राजेंद्र अण्णा व अमरसिंह देशमुख यांच्यासोबत आमचे देखील प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

गोपीचंद पडळकर म्हणाले की, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे विकासाला गती मिळेल. कामथ एमआयडीसीसाठी पाण्याची सोय झाल्याने ती लवकरच मार्गी लागेल. राजेंद्र अण्णांचे साखर कारखाना सुरू व्हावा, म्हणून प्रयत्न सुरू आहेत. पण त्यात अडथळा आणला जात असेल, तर जिल्हा बँकेवर प्रशासक आणण्यासाठी प्रयत्न करू. चुकीचे राजकारण करणाऱ्यांना धडा शिकवू, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

यावेळी प्रमोद शेंडगे, शंकर मोहिते, नितीन पाटील, ब्रम्हानंद पडळकर, विष्णुपंत अर्जुन, जयवंत सरगर, श्रीरंग कदम, विपुल कदम, विकास कदम, दादासाहेब पाटील, संग्राम नवले आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button