

सांगली; पुढारी वृत्तसेवा : येथील पद्माळे फाटा ते माधवनगर रेल्वे स्थानक दरम्यान अजित बाबूराव अंगडगिरी (वय 19, रा. ऐश्वर्या गार्डनजवळ, कर्नाळ रस्ता, सांगली) याच्या खुनाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण व शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाला गुरुवारी यश आले. काही दिवसापूर्वी कॉलेज कॉर्नरवर एका महाविद्यालयात झालेल्या भांडणातून अजितची धारदार शस्त्राने भोसकून 'गेम' केल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. याप्रकरणी तीन हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे.
अटक केलेल्यांमध्ये सुजित राजाराम शिंदे (वय 18, रा. शामरावनगर, दुर्वांकूर कॉलनी, सांगली), सौरभ सदाशिव वाघमारे (20) व सुफीयान फिरोज बागवान (19, दोघे रा. शंभरफुटी रस्ता, सांगली) यांचा समावेश आहे. त्यांना पुढील तपासासाठी शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मृत अजित सांगलीत एका महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत होता. तो फोटोग्राफीचा व्यवसाय करीत होता. काही दिवसापूर्वी त्याचा किरकोळ वादातून संशयितांशी महाविद्यालयात वाद झाला होता. त्याचे पर्यवसान मारामारीतही झाले होते. काही मित्रांनी मध्यस्थी करून वाद मिटविला होता. संशयितांनी अजितला 'तुला बघून घेतो', अशी धमकी दिली होती. तेव्हापासून त्यांच्यात खुन्नस सुरू होती. रस्त्यावरून जातानाही ते अजितकडे डोळे वटारून पहायचे.
दोन दिवसापूर्वीही त्यांच्यात वाद झाला. यातून संशयितांनी अजितचा काटा काढण्याचे ठरविले. अजित बुधवारी माधवनगर रेल्वे स्थानकालगत असलेल्या शेतात खत टाकण्यासाठी गेला होता. त्यावेळी संशयित तिथे गेले. त्यांनी अजितला शेतातून रस्त्यावर बोलावून घेऊन धारदार शस्त्राने वार केला. हा वार छातीत वर्मी बसल्याने अजित रुग्णालयात जाण्यापूर्वीच मरण पावला होता.
जिल्हा पोलिस प्रमुख दीक्षित गेडाम यांनी गंभीर दखल घेत हल्लेखोरांना तातडीने अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण व शहर पोलिसांची पथके हल्लेखोरांचा शोध घेत होती. तिघांची नावे निष्पन्न झाली. यातील एकाला विश्रामबाग येथील वारणालीत, तर दोघांना तानंग फाट्यावर अटक करण्यात यश आले. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबद्दल तपास सुरू आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, शहरचे अभिजित देशमुख, हवालदार गुंडोपंत दोरकर, संदीप पाटील, संदीप गुरव, बिरोबा नरळे, मेघराज रुपनर, सागर लवटे, आर्यन देशिंगकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.