सांगली : आगाप सोयाबीनच्या सुगीची धांदल | पुढारी

सांगली : आगाप सोयाबीनच्या सुगीची धांदल

ऐतवडे बुद्रुक; पुढारी वृत्तसेवा : वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक, शेखरवाडी परिसरात आगाप खरीप सोयाबीन पिकांची काढणी व मळणी गतीने सुरू आहे. ढगाळ वातावरणामुळे पिकावर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. संततधार पावसामुळे सोयाबीनची पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे सोयाबीनच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होत आहे.

सुरुवातीला पडलेल्या मोठ्या पावसामुळे शेतकर्‍यांनी खरीप सोयाबीन, भुईमूग, ज्वारीची पेरणी व टोकण केली. चक्क दीड महिना पावसाने ओढ दिल्याने पाण्याची उपलब्धता नसलेल्या शेतकर्‍यांचा खरीप वाया गेला. पाण्याची उपलब्धता असणारे शेतकर्‍यांनी पाटाने तर स्प्रिंकलरने पिकांना पाणी देऊन आगाप सोयाबीन पिकांना जीवदान दिले. नंतर मान्सून पावसाने हजेरी लावल्याने सुकून गेलेल्या पिकात परत शेतकर्‍यांनी मशागत करून पेरणी केली.

सध्या परिसरात काढणीस आलेला खरीप पदरात पडण्यासाठी जास्तीत जास्त मजुरांचा तांडा घेऊन मळणी, काढणी करताना शेतकरी दिसत आहेत. दररोज ऊन-पावसाचा खेळ सुरूच आहे. यंदा झालेल्या पावसामुळे ढगेवाडी, ऐतवडे बुद्रुकमध्ये तलाव, बंधारे तुडुंब भरले आहेत. त्यामुळे रब्बीला पाण्याची कमतरता भासणार नाही. तसेच वारणा पट्ट्यात ऊसात हुमणी व लोकरी माव्याचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हातबल झाला आहे. कृषी विभागाचे अधिकारीही शेतकर्‍यांना मार्गदर्शन करत आहेत. पण हुमणीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असल्यामुळे ऊस उन्मळून पडत आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

शेंड्याला मावा; बुडक्याला हुमणी

ऐतवडे बुद्रुकसह वारणा पट्ट्यात हुमणीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे उसाच्या मुळ्या हुमण्या खात आहेत. त्यामुळे शेंड्याला मावा आणि बुडक्याला हुमणी असा काहीसा प्रकार दिसून येत आहे. ऊस पिक धोक्यात आले आहे.

Back to top button