सांगली : जिल्हा बँकेच्या ठेवीत 2 हजार कोटींची वाढ | पुढारी

सांगली : जिल्हा बँकेच्या ठेवीत 2 हजार कोटींची वाढ

सांगली; शशिकांत शिंदे : राज्यातील अनेक जिल्हा मध्यवर्ती बँका अडचणीत आहेत. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भातील बँका तोट्यात असून अनेकांचा कर्ज पुरवठा ठप्प आहे. त्याचवेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची मात्र घोडदौड सुरू आहे. गेल्या पाच वर्षात या बँकेच्या ठेवी सुमारे दोन हजार कोटींनी वाढलेल्या आहेत. सन 2017-18 मध्ये 4 हजार 8 22 कोटी रुपये असलेल्या ठेवी सन 2021-22 मध्ये 6 हजार 835 कोटी रुपयांपर्यंत गेल्या आहेत. गेल्या पाच वर्षांमध्ये महापूर, कोरोना संसर्ग, जागतिक मंदी, अशी अनेक संकटे आली असतानाही या प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत शेतकर्‍यांचा बचतीकडेही कल वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा बँक या परिस्थितीतही सक्षम झाली आहे.

राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँका दिवसेंदिवस वाढत असल्या तरी ग्रामीण आणि सर्वसामान्य जनता, शेतकरी यांच्यादृष्टीने जिल्हा बँकांचे महत्व खूप मोलाचे आहे. राज्यात 31 जिल्हा बँका आहेत. त्यांचे ग्रामीण भागात मोठे नेटवर्क आहे. जिल्हा बँकांचा राज्यात कर्ज वाटपात सुमारे 40 टक्के तर जिल्हा सांगली जिल्हा बँकेचे एकूण शेती कर्ज वाटपात 80 टक्के वाटा आहे. जिल्हा बँकेच्या 219 शाखा आहेत. या शाखा सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकर्‍यांना तसेच सामान्यांना कर्ज वाटपाचे काम करीत आहेत. जिल्ह्याच्या पूर्व भागात सिंचन योजनांमुळे पाणी गेले आहे. त्यामुळे द्राक्षे, डाळिंब, ऊस, भाजीपाला याचे क्षेत्र वाढत आहे. विविध उद्योग, दुग्ध उद्योगाला चालना मिळालेली आहे. त्यामुळे लोकांकडे पैसे येत आहेत. त्यातून बचत करण्याकडे लोकांचा कल वाढत असल्याचे दिसून येत आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकर्‍यांना आणि सर्वसामान्य व्यक्तींना डोळ्यासमोर ठेवून काम करीत आहे. शेती कर्जातील सर्वाधिक 80 टक्के वाटा हा जिल्हा बँकेचा आहे.  संस्थाकडील थकबाकी वसुलीसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. लहान व्यावसायिकांना कर्ज देण्यात येत आहे. बँकेवर लोकांचा विश्वास वाढत असून बँक अधिक सक्षम होत आहे.

– आ. मानसिंगराव नाईक अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँक

Back to top button