सांगली : मराठा आरक्षणामध्ये कमी पडणार नाही : चंद्रकांत पाटील | पुढारी

सांगली : मराठा आरक्षणामध्ये कमी पडणार नाही : चंद्रकांत पाटील

सांगली; पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षण व मराठा समाजाला विविध सोयीसुविधा देण्यात सरकार कमी पडणार नाही. चांगल्या वकिलांची फौज उभी करून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिकेवर भक्कम बाजू मांडू, असे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा मराठा आरक्षण व सुविधा उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले.

मंत्री चंद्रकांत पाटील शुक्रवारी सांगली दौर्‍यावर होते. आमदार सुधीर गाडगीळ जनसंपर्क कार्यालयात मराठा समाज संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. मराठा आरक्षण व सुविधा उपसमितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांचा मराठा समाजतर्फे सत्कार करण्यात आला. खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, भाजपचे नेते शेखर इनामदार, सत्यजित देशमुख तसेच मराठा समाज संस्थेचे अध्यक्ष अभिजित पाटील, अ‍ॅड. उत्तमराव निकम, मराठा सेवा संघाचे माजी अध्यक्ष किरण पाटील, मराठा छावणीचे सचिव सर्जेराव पाटील, मराठा सेवा संघाचे विश्वजित पाटील, शरद नलवडे, श्रीकांत शिंदे, सतीश साखळकर, प्रशांत आरबुने, कृष्णा पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची याचिका नीटपणे चालवली नाही. परिणामी आरक्षण गेले. आता पुन्हा हे आरक्षण मिळवण्यासाठी नेटाने काम करणार आहोत. मराठा समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी राज्य सरकार झपाटून काम करेल. कितीही पैसे लागू दे; पण मराठा समाजाला विविध सोयीसुविधा देण्यामध्ये राज्य शासन कुठेही कमी पडणार नाही. मराठा सेवा संघाचे किरण पाटील यांनी मागण्या मांडल्या. अण्णासाहेब पाटील महामंडळातून शैक्षणिक कर्ज मिळावे, सांगलीत मुला/मुलींचे वसतिगृह सुरू करावे, सारथीसाठी दिलेल्या जागेवर नियोजित प्रकल्प उभारावा, महामंडळातून महिलांसाठी उद्योग व व्यवसायासाठी कर्ज मिळावे, महिला स्वावलंबनासाठी एकाच इमारतीत प्रशिक्षण, विक्री व सेवा सुविधा तयार करावी या व अन्य मागण्या मांडण्यात आल्या.

Back to top button