सांगली : घरेलू कामगार मंडळासाठी 50 कोटींची तरतूद करू : मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन | पुढारी

सांगली : घरेलू कामगार मंडळासाठी 50 कोटींची तरतूद करू : मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन

सांगली; पुढारी वृत्तसेवा : घरेलू कामगार कल्याण मंडळासाठी डिसेंबरच्या अधिवेशनात 50 कोटींची तरतूद करू. मार्चमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंडळासाठी भरीव आर्थिक तरतूद केली जाईल, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. दरम्यान, आगामी निवडणुकीत महापालिकेची सत्ता भाजपच्या हाती द्या. भ्रष्टाचार संपवून उत्तम काम होईल, असेही पाटील यांनी सांगितले.

भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. स्वाती शिंदे यांनी आयोजित केलेल्या घरेलू कामगार महिला मेळाव्यात मंत्री पाटील बोलत होते. खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, शेखर इनामदार, माजी आमदार नितीन शिंदे, स्थायी समितीचे सभापती धीरज सूर्यवंशी, मकरंद देशपांडे, समित कदम, नीता केळकर, सुनंदा राऊत, आदित्य पटवर्धन उपस्थित होते. मंत्री पाटील म्हणाले, राज्यात 50 लाख घरेलू कामगार महिला नोंदणीकृत आहेत. डिसेंबरमधील अधिवेशनात घरेलू कामगार कल्याण मंडळसाठी 50 कोटींची तरतूद केली जाईल. घरेलू महिला कामगार, रिक्षावाले, बांधकाम कामगार, वृत्तपत्र विक्रेते, भाजी विक्रेते आदींसह विविध 20 घटकांच्या कल्याणासाठीच्या मंडळांना निधीची भरीव तरतूद केली जाईल. घरेलू महिला कामगारांसाठी दहा दिवसांचे मोफत केटरिंग प्रशिक्षण सुरू करावे. संबंधित महिलांनी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना 500 रुपये द्यावेत. मुलींना लाठीकाठी प्रशिक्षण द्यावे, असे चंद्रकांत पाटील यांनी सुचवले.

पाटील म्हणाले, महापौर निवडणुकीतील गद्दारीनंतर स्थायी समिती सभापती निवडणुकीतील घडामोडी व धीरज सूर्यवंशी यांचा विजय महत्वपूर्ण होता. सांगलीत भाजपचे काम चांगले आहे. खासदार पाटील म्हणाले, घरेलू महिला कामगारांसाठी अ‍ॅड. स्वाती शिंदे अतिशय चांगले काम करत आहेत. पक्ष त्यांच्या पाठिशी आहे. नितीन शिंदे म्हणाले, घरेलू महिला कामगार कल्याण मंडळासाठी 1 हजार कोटींची तरतूद करावी. बांधकाम कामगारांना मिळणार्‍या सुविधा घरेलू महिला कामगारांना मिळाव्यात. गाडगीळ म्हणाले, मेळाव्याला झालेली मोठी गर्दी ही घरेलू महिला कामगारांसाठी अ‍ॅड. स्वाती शिंदे यांनी केलेल्या कामाची पोहोचपावती आहे. अ‍ॅड. स्वाती शिंदे म्हणाल्या, घरेलू महिला कामगारांना वयाची साठ वर्षे झाल्यानंतर पेन्शन मिळावी. त्यांना मुला-मुलींना शिष्यवृत्ती मिळावी. कल्याण मंडळाचे पुनरूज्जीवन करून घरेलू महिला कामगारांचे जीवनमान उंचवावे.

Back to top button