सांगली : स्मार्ट एलईडी प्रकल्पाच्या बिल मसुद्याची मंजुरी रोखली; अटी, शर्तींच्या पूर्ततेनंतरच मंजुरी | पुढारी

सांगली : स्मार्ट एलईडी प्रकल्पाच्या बिल मसुद्याची मंजुरी रोखली; अटी, शर्तींच्या पूर्ततेनंतरच मंजुरी

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  स्मार्ट एलईडी प्रकल्पाच्या बिलाच्या मसुद्याची मंजुरी रोखण्याचे आदेश स्थायी समिती सभेत देण्यात आले. सर्व पथदिवे लागल्यानंतर व प्रकल्पाच्या सर्व अटी, शर्तींच्या पूर्ततेनंतरच मंजुरी देण्याचे आदेश सभापती धीरज सूर्यवंशी यांनी दिले.
महापालिकेत गुरूवारी स्थायी समिती सभा झाली. अध्यक्षस्थानी धीरज सूर्यवंशी होते. सदस्य संतोष पाटील, फिरोज पठाण, अ‍ॅड. स्वाती शिंदे, रोहिणी पाटील, शुभांगी साळुंखे, संगीता हारगे, पवित्रा केरिपाळे, डॉ. नर्गिस सय्यद, संजय कुलकर्णी, गजानन आलदर, प्रकाश ढंग, कल्पना कोळेकर व सदस्य उपस्थित होते.

स्मार्ट एलईडी प्रकल्प राबविणार्‍या समुद्रा या कंपनीने महापालिकेला बिलाचा मसुदा मंजुरीसाठी पाठविला आहे. महापालिका क्षेत्रात अजून दहा हजारावर पथदिवे बसवायचे आहेत. निविदेतील अनेक अटी, शर्तींची पूर्तता व्हायची आहे. त्यामुळे सर्व एलईडी पथदिवे
बसवल्याशिवाय व अटी, शर्तींच्या पूर्ततेशिवाय बिलाच्या मसुद्याला मंजुरी देऊ नये, असे आदेश सूर्यवंशी यांनी दिले.

सहा अधिकारी अनुपस्थित

स्थायी समिती सभेला सहा अधिकारी अनुपस्थित होते. स्थायी समितीच्या परवानगीशिवाय अधिकारी गैरहजर राहिल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. परवानगीशिवाय अधिकारी अनुपस्थित राहिल्यास कारवाई प्रस्तावित केली जाईल, असा इशारा देण्यात आाला. भूसंपादनचे अधिकार स्थायीला महापालिका अधिनियमातील सेक्शन 77 अन्वये महापालिकेला कोणतीही जमीन संपादन करायची असल्यास स्थायी समितीला अधिकार आहेत. यापुढे भूसंपादनाचे विषय महासभेपुढे न ठेवता स्थायी समितीपुढे ठेवण्याचे आदेश अधिकार्‍यांना दिले.

आर्थिक लेखा-जोखा दर पंधरवड्याला

महापालिकेचा आर्थिक लेखा-जोखा दर पंधरवड्याला स्थायी समितीपुढे ठेवण्याचे निर्देश अ‍ॅड. स्वाती शिंदे, संतोष पाटील यांनी दिले. खर्च,
शिल्लक रक्कम, अनामत शिल्लक, ठेवी याबाबतची माहिती स्थायी समितीपुढे ठेवण्यात येईल. शासन निर्णय, परिपत्रके यांचीही माहिती स्थायी समितीपुढे ठेवण्याचे आदेश दिले.

पुढील मिटींग स्थायी सभागृहात

महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहाच्या कामाची निविदा सन 2019 मध्ये निघालेली आहे. मात्र अद्याप काम अपूर्ण आहे. अपूर्ण कामे
पूर्ण करून घ्यावीत. स्थायी समितीची पुढील सभा स्थायी समिती सभागृहाच्या आहे त्या स्थितीत होईल, असे सूर्यवंशी यांनी सुनावले. पंचमुखी मारुती मंदिरासमोरील दक्षिणोत्तर रस्ता खुला करण्यासंदर्भात तसेच महापालिका क्षेत्रातील जिल्हा परिषद प्राथमिक
शाळांच्या हस्तांतरणाबाबत चर्चा झाली.

छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये अंधार

सांगलीत छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये अंधार असल्याकडे तसेच स्टेडियममधील स्वच्छतागृहाची दूरवस्था झाल्याकडे अ‍ॅड. शिंदे यांनी लक्ष वेधले. दरम्यान, विद्युत व्यवस्था, स्वच्छतागृहाची दुरुस्ती तातडीने करण्याचे आदेश सूर्यवंशी यांनी दिले.

पुतळ्याची फाईल हरवली

मिरजेत महात्मा बसवेश्वर महाराज यांचा पुतळा उभारण्याच्या कामाची फाईल हरवल्याची तक्रार सदस्य संगीता हारगे यांनी केली. फाईलचा शोध घेण्याचे व संबंधितांवर कारवाईचे आदेश सूर्यवंशी यांनी दिले. अनेक लाभार्थींनी अर्ज करूनही स्वच्छतागृह अनुदान
रखडल्याची माहिती समोर आली. यासंदर्भात शुक्रवारी बैठक बोलवण्याचे निर्देश सभापती सूर्यवंशी यांनी दिले.

Back to top button