सांगली : पाणीचोरीचा अनोखा फंडा निदर्शनास | पुढारी

सांगली : पाणीचोरीचा अनोखा फंडा निदर्शनास

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  महापालिका क्षेत्रात अष्टविनायकनगरमधील पाचव्या गल्लीत पाणी चोरीचा अनोखा फंडा निदर्शनास आला आहे. घरमालकाने एका भाडेकरूला मीटरचे पाणी, तर दुसर्‍या भाडेकरूला मीटरच्या अगोदरच नळकनेक्शनला फाटा जोडणी करून पाणी दिले आहे. ही बाब महापालिकेच्या निदर्शनास आणूनही कारवाई होत नसल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते सिद्धाराम शिरकनाळ्ळे यांनी केली आहे.

शिरकनाळ्ळे म्हणाले, महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 8 मधील अष्टविनायकनगरमध्ये अळीमिश्रित पाणी येत होते. पाण्याची गळती शोधताना खोदाईवेळी एका ठिकाणी नळ कनेक्शनला फाटा जोडणी करून पाणी वापर होत आल्याचे निदर्शनास आले. हा पाणीचोरीचा गंभीर प्रकार आहे.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे याबाबत तक्रार केली आहे. मात्र अद्याप कारवाई झालेली नाही. आयुक्त सुनील पवार यांनी हा प्रकार गांभिर्याने घ्यावा. संबंधितांवर दंडात्मक कारवाई तसेच पाणी चोरी केलेल्या कालावधीतील पाणी बिल वसूल करावे. महापालिका क्षेत्रातील पाणी चोरी, पाणी गळतीचा हा एक नवा फंडा समोर आला आहे. पाणीपुरवठा विभागाने अशाप्रकारची पाणी चोरी, पाणी गळती गांभिर्याने घेणे गरजेचे आहे. मात्र, तक्रार करूनही दुर्लक्ष होत असेल तर हा प्रकार गंभीर आहे.

Back to top button