

सांगली; शिवाजी कांबळे : गेल्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यात घटस्फोटाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे अशिक्षितांपेक्षा सुशिक्षित लोकांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण जास्त असलेले दिसत आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये घटस्फोटाचे प्रमाण अधिक असलेले दिसते. पती-पत्नीमध्ये असलेला परस्पर सामंजस्याचा अभाव, पूर्वापार संस्कारांचा अभाव, अहमपणा, व्यसन, संशय, नोकरी-धंद्यानिमित्त जोदीदारा व्यतिरिक्त अन्य व्यक्तीशी वाढती जवळीकता आदी बाबी घटस्फोटांच्या वाढत्या प्रमाणाला कारणीभूत ठरत आहेत.
आज जिल्ह्यात घटस्फोटासाठीचे 560 खटले प्रलंबित आहेत. याशिवाय पोटगीसाठीचेही 720 खटले न्यायप्रविष्ट आहेत.
सुमारे तीन वर्षांपूर्वी सांगली जिल्ह्यासाठी स्वतंत्र कौटुंबिक न्यायालय स्थापन करण्यात आले आहे. जिल्हा न्यायाधीश दर्जाच्या न्यायाधीशांची नियुक्ती या न्यायालयामध्ये करण्यात आलेली आहे. या न्यायालयासमोर घटस्फोट, पोटगी, मुलांचा ताबा आदी 1550 प्रकरणे प्रलंबित आहेत.
पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीत संस्काराचा व परंपरेचा पगडा होता. आधुनिक काळात शिक्षणाचा प्रसार झाल्याने सुशिक्षित मुलींच्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नोकरदार मुलाला जोडीदार पत्नीदेखील नोकरदार असावी असे वाटू लागले, परिणामी अनेक कुटुंबात पती-पत्नी दोघेही मिळवते झाले आहेत. परिणामी दिवसातील बराच वेळ विभक्त राहिल्याने त्यांच्यामधील दुरावा वाढताना दिसत आहे. त्याचवेळी पती-पत्नी काम करत असलेल्या ठिकाणी अन्य व्यक्तीविषयी आकर्षण व जवळीकता वाढताना दिसते. हेही घटस्फोटाला कारणीभूत ठरत आहे.
ग्रामीण भागात अजूनही पारंपरिक संस्काराचा पगडा दिसून येतो. शिवाय एक प्रकारचा सामाजिक दबाव पती-पत्नी दोघांवरही असतो, शहरात पारंपरिक संस्कार आणि सामाजिक दबाव या बाबी अगदी अपवादाने आढळतात. त्यामुळे ग्रामीण भागात घटस्फोटाचे प्रमाण नगण्य आहे. संशयकल्लोळ ही घटस्फोटासाठी पहिली पायरी ठरताना दिसते. नोकरी किंवा व्यवसाय करीत असलेल्या पती-पत्नीमध्ये अनेकदा संशयकल्लोळाची वादळे उठताना दिसतात. एकमेकांचे फोनवरील बोलणेही काही जोडप्यांना संशयास्पद वाटू लागते. परिणामी प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचते.
आजकाल मोबाईलवरील संभाषण, व्हॉटसअॅप संदेश, फेसबुक मैत्री, सोशल मीडियाचा वापर या बाबी नैमित्तिक आणि काहीवेळा अत्यावश्यक झालेल्या आहेत. पण, अनेकदा मोबाईल वापराचा अतिरेकही यासाठी कारणीभूत ठरत आहे.
श्रीमती सुनीता चौधरी या सांगली जिल्ह्याच्या कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. कायद्याच्या पदवीबरोबर त्यांनी विविध अभ्यासक्रमातील एकूण 26 पदव्या मिळवून रेकॉर्ड केले आहे. न्यायदान करत असताना कोणावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेताना त्यांच्या निर्णयातून दिसतात. त्यांच्या जलद न्यायदानामुळे पीडित व्यक्तीला लवकर न्याय मिळण्यास मदत होत आहे.