सांगली: आजपासून जनावरांचे सार्वत्रिक लसीकरण; 67 हजार जनावरांना टोचला डोस | पुढारी

सांगली: आजपासून जनावरांचे सार्वत्रिक लसीकरण; 67 हजार जनावरांना टोचला डोस

सांगली; पुढारी वृत्तसेवा : लम्पी स्किनला रोखण्यासाठी प्रशासनाकडून जिल्ह्यात युद्धपातळीवर जनावरांना लसीकरण करण्यात येत आहे. सध्या 67 हजार 161 जनावरांना लस टोचण्यात आली आहे. तसेच शासनाच्या आदेशानुसार बुधवार, दि.21 पासून पशुवैद्यकीय दवाखाना असणार्‍या गावात आणि त्यांच्या परिसरातील जनावरांचे लसीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सदाशिव बेडक्याळेे यांनी दिली.

जिल्ह्यात आतापर्यंत 118 जनावरांना लम्पी स्किनची बाधा झाली आहे. तसेच तीन जनावरांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. 45 जनावरे उपचारातून बरी झाली आहेत. लम्पी स्किनला थोपवण्यासाठी विविध दूध संघ आणि प्रशासनाकडून जिल्ह्यात जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे. मंगळवारी 48 हजार असणारा लसीकरणाचा आकडा बुधवारी 67 हजार 161 पर्यंत गेला होता. एका दिवसात 19 हजार 161 जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे.

सध्या जिल्हा प्रशासनाकडे लसीचा 34 हजारांचा साठा उपलब्ध आहे. तसेच बुधवारी नव्याने 50 हजार लस उपलब्ध होणार आहे. शासनाच्या आदेशानुसार आतापर्यंत बाधित जनावराच्या ठिकाणापासून पाच किलोमीटरच्या अंतरावर असणार्‍या जनावरांचे लसीकरण करण्यात येत होते. मात्र, मंगळवारपासून शासनाकडून आलेल्या आदेशानुसार आता पशुवैद्यकीय दवाखाना असणार्‍या गावात आणि त्याच्या आसपासच्या सर्व गावांतील जनावरांचे लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुमारे 4 लाख गाय आणि बैल आहेत. त्याचे लसीकरण प्राधान्याने करण्यात येणार आहे.
गावात असणार्‍या पशुवैद्यकीय अधिकारी यांना लसीकरण करण्यात मदत करण्यासाठी 311 खासगी सेवा दाते यांना सेवा तत्त्वावर नेमण्यात आले आहे, तसे आदेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत जिल्ह्यातील संपूर्ण जनावरांचे लसीकरण होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

जिल्ह्यातील रिक्तजागेची मागवली माहिती; भरतीसाठी हालचाली सुरू

जिल्ह्यात एका बाजूला लम्पी स्किनचा प्रादुर्भाव वाढत आहे. तर दुसर्‍या बाजूला पशुसंवर्धन विभागात असणार्‍या रिक्त पदामुळे अनेक अडचणी येत आहेत. मात्र, शासनाने जिल्ह्यात असणार्‍या रिक्त पदांची माहिती मागवली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून 29 पशु संवर्धनच्या पर्यवेक्षकांच्या रिक्त जागेची माहिती पाठवण्यात आली आहे. त्यामुळे शासनस्तरावर भरतीची हालचाली सुरू झाल्याचे बोलले जाते.

 

Back to top button