सांगली : पुणे-बंगळूर ग्रीनफिल्ड महामार्गासाठी भूसंपादन सुरू! | पुढारी

सांगली : पुणे-बंगळूर ग्रीनफिल्ड महामार्गासाठी भूसंपादन सुरू!

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाच्या बहुचर्चित पुणे-बंगळूर ग्रीनफिल्ड महामार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे. जिल्ह्यातील खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ आणि मिरज तालुक्यांतील 38 गावांच्या हद्दीतून हा महामार्ग जाणार आहे. या महामार्गाची जिल्ह्यातील एकूण लांबी 75 किलोमीटर इतकी आहे. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी गतवर्षी पुणे येथील एका कार्यक्रमात नवीन पुणे-बंगळूर ग्रीनफिल्ड महामार्गाची घोषणा केली होती. त्यानंतर सातारा येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी लवकरच या महामार्गाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचीही घोषणा केली होती. त्यानुसार या महामार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू केली आहे.

सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी याबाबतची नोटीस नुकतीच जारी केली आहे. त्यानुसार खानापूर आणि मिरजेच्या उपविभागीय अधिकार्‍यांची या कामी भूसंपादन अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. हा महामार्ग खानापूर तालुक्यातील माहुली येथे जिल्ह्यात प्रवेश करेल आणि मिरज तालुक्यातील संतोषवाडीतून पुढे कर्नाटकात जाईल. एकूण 699 किलोमीटर लांबीचा आणि आठपदरी असा हा महामार्ग असून, या कामासाठी 40 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पुणे (हडपसर) – सासवड – बारामती – फलटण – मायणी – विटा – तासगाव – मिरज – अथणी – बेळगाव – बंगळूर असा हा महामार्ग असणार आहे.

जिल्ह्यातील ग्रीनफिल्ड महामार्ग, समाविष्ट गावे

खानापूर तालुका : माहुली, वलखड, वेजेगाव भेंडवडे, साळशिंगे, जोंधळखिंडी, माधळमुठी, वासुंबे, रेणावी, रेवणगाव, घोटी बुद्रुक आणि घोटी खुर्द.
तासगाव तालुका : कचरेवाडी, नरसेवाडी, किंदरवाडी, विजयनगर, पेड, मोराळे, मांजर्डे, शिरगाव, हातनोली, बस्तवडे, सावळज, वज्रचौंडे, मणेराजुरी आणि गव्हाण.
कवठेमहांकाळ तालुका : बोरगाव, मळणगाव, हारोली, देशिंग, बनेवाडी, शिंदेवाडी, कुकटोळी, रामपूरवाडी आणि कोगनोळी.
मिरज तालुका : सलगरे, बेळंकी आणि संतोषवाडी.

Back to top button