कडेगाव : पावसामुळे गाळप हंगाम लांबणार | पुढारी

कडेगाव : पावसामुळे गाळप हंगाम लांबणार

कडेगाव; रजाअली पिरजादे : पावसाचा जोर तालुक्यात कायम आहे. ऊसतोड मजुरांच्या टोळ्या देखील अद्याप दाखल झालेल्या नाहीत. 1 ऑक्टोबर पासून गाळप हंगाम सुरू होणार असल्याचे साखर आयुक्त व जिल्ह्यातील कारखानदारांकडून निश्चित झाले असले तरी चालू गळीत हंगाम लांबणीवर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कडेगाव तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र टेंभू आणि ताकारी सिंचन योजनेमुळे तालुक्याचे भाग्य उजळले आहे. तालुक्यातील एकूण 58 हजार हेक्टर क्षेत्रापैकी 50 हजार हेक्टर क्षेत्र पिकावू क्षेत्र आहे. त्यापैकी सुमारे 25 हजार हेक्टर उसाचे क्षेत्र आहे. त्यामुळे चालू वर्षी तालुक्यातील शेतकर्‍यांचा वेळेत ऊस गाळप करण्याचे मोठे आव्हान कारखानदारांसमोर आहे.

तालुक्यातील ऊस डॉ. पतंगराव कदम सोनहिरा कारखाना, क्रांती कारखाना, उदगिरी शुगर, गोपूज कारखाना, कृष्णा कारखाना, सह्याद्री कारखान्यासह अन्य कारखान्यास गळपासाठी जातो. मागील चार वर्षांपासून तालुक्यातील उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
परिणामी उसाचे उत्पादनही वाढले आहे. मागील हंगाम एप्रिल तर काही कारखान्यांचा मे महिन्यापर्यंत सुरू होता. चालू वर्षीही गाळप हंगाम पावसामुळे उशिरा सुरू झाल्यास वेळेत ऊस गाळप करण्यासाठी कारखानदारांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. दरम्यान, अद्याप ऊसतोड मजुरांच्या टोळ्या तालुक्यात दाखल झालेल्या नाहीत. गणेशोत्सव नुकतेच पार पडले असून दुर्गा उत्सव सुरू होणार आहे. त्यानंतर 5 ऑक्टोबरला दसरा सण आहे. हे सणासुदीचे दिवस झाल्यानंतरच टोळ्या दाखल होतील. तर पाऊसही किती दिवस राहील यावर गाळप हंगामाचे भवितव्य ठरणार आहे.

शेतकरी चिंतेत

चालू वर्षी जून, जुलैमध्ये पावसाने चांगली हजेरी लावली होती. त्यानंतर पावसाने मध्यंतरी उघडीप दिली. मात्र सप्टेंबर महिन्यात पुन्हा पावसाने जोर धरला आहे. ऊस गाळपास वेळेत जाणार की मागील वर्षीप्रमाणे पुन्हा विलंब होणार या भीतीने शेतकरी चिंतेत सापडला आहे.

Back to top button