सांगली : शिक्षकांनी जिल्हा बँकेचे थकवले 25 कोटी | पुढारी

सांगली : शिक्षकांनी जिल्हा बँकेचे थकवले 25 कोटी

सांगली;  पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यातील शिक्षकांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 25 कोटी रुपयांची कर्जे थकवली आहेत. त्यामुळे बँकेने संबंधित शिक्षक, मुख्याध्यापकासह 250 जणांना वसुलीसाठी नोटीस काढली आहे. कर्जे थकवलेल्या शिक्षकांमध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचा समावेश आहे. त्यामध्ये प्राथमिक शिक्षकांची संख्या सर्वाधिक आहे.

जिल्हा बँकेने शिक्षकांना 25 कोटी रुपयांची कर्जे दिली होती. त्यावेळी यातील बहुतांश शिक्षकांचा पगार सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत होत होता. गेल्या काही दिवसात काही शिक्षकांनी आपले पगार अन्य बँकांत करण्यासाठी प्रयत्न केले. त्यात त्यांना यश आले. यामुळे जिल्हा बँकेची त्यांनी काढलेली कर्जे थकली आहेत. विशेष म्हणजे जिल्हा बँकेची कर्जे देताना संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकारी यांचे हमीपत्र घेतली आहेत. त्यानुसार जिल्हा बँकेने जोरदार कारवाई सुरू केलेली आहे. मात्र त्यावेळी घेतलेली हमीपत्र ठराविक नमुन्यात नसल्याचा फायदा संबंधित शिक्षकांनी उचलला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित शिक्षकांकडून नियमाप्रमाणे हमीपत्र घेण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू झालेले आहे.

दरम्यान, बँकेने कर्जे वसुलीसाठी ओटीएस योजनेला मुदतवाढ दिली आहे. यामध्ये बिगरशेतीच्या 33 संस्था योजनेत सहभागी झाल्या आहेत. अद्यापही अनेक संस्थांची थकबाकी कायम आहे. त्यामुळे ओटीएस योजनेत सहभागी होण्यासाठी मार्च 2023 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णयही घेतला. बँकेची सुमारे 400 कोटीची कर्जे थकीत आहेत. त्यासाठी ओटीएस योजना सुरू केली. मार्च अखेर एनपीए 10 टक्केच्या आत आणण्यासाठी बँकेचे प्रयत्न सुरू आहेत.

बड्यासह सर्वच थकबाकीदारावर कारवाईचा धडाका

बँकेकडून थकीत कर्जे वसुलीसाठी जोरदार मोहीम राबवली जात आहे. सांगली जिल्हा बँकेचा एनपीए कमी करण्यासाठी सध्या लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व कर्जदारांना नोटीस देणे प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यात बड्या कर्जदार, संस्थांचाही समावेश आहे. आता टॉप वीस, तीस नव्हे तर सर्वच संस्था टार्गेटवर आहेत.

Back to top button