सांगली : तासगाव बाजार समितीत साडेचार कोटींचा घोटाळा | पुढारी

सांगली : तासगाव बाजार समितीत साडेचार कोटींचा घोटाळा

तासागव; पुढारी वृत्तसेवा :  तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सांगली – तासगाव रस्त्यावरील विस्तारित बेदाणा मार्केटच्या बांधकामात प्रत्यक्ष केलेल्या कामापेक्षा 4 कोटी 51 लाख रुपये ठेकेदाराला जादा देऊन या रकमेचा घोटाळा केला असल्याचे लेखापरीक्षणात आढळून आले आहे. कोल्हापूर येथील विशेष लेखापरीक्षक यांनी संबंधित संचालक मंडळ, सचिव व प्रशासक यांना जबाबदार धरून 34 जणांना नोटीस दिली असल्याची माहिती तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महादेव पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली.

बाजार समितीचे संचालक अनिल विश्वासराव पाटील, विठ्ठल शंकर काशीद, अरविंद पांडुरंग शेडगे, साहेबराव नारायण पाटील, कुंदा श्रीरंग चव्हाण, विमल दिनकर झांबरे, वंदना बाबासाहेब अमृतसागर, बाळासाहेब नरहरी ऐडके, शामराव संपतराव चव्हाण, दादासाहेब रामचंद्र जाधव, सुभाष महारुद्र हिंगमिरे, तानाजी भगवान पाटील (मृत), अविनाश दिनकरराव पाटील, आनंदराव नारायण भोसले, दिलीप नामदेव पाटील, रवींद्र वसंतराव पाटील, संपतराव हिंदुराव सूर्यवंशी (मृत), सतीश वसंतराव झांबरे, दिनकर दत्तात्रय पाटील, अ‍ॅड. जयसिंग भगवान पाटील (मृत), पुष्पा अर्जुन पाटील, रंजना विजयराव पाटील, अजित नारायण जाधव, राजाराम गुंडा पाखरे, धनाजी नारायण पाटील, कुमार रामचंद्र शेटे, लक्ष्मण आकाराम पाटील, ज्ञानू देवाप्पा सोलनकार, पितांबर शामराव पाटील, नवनाथ जगन्नाथ म्हस्के, विवेक गजानन शेडगे या संचालक तसेच प्रशासक शंकर महादेव पाटील व सचिव चंद्रकांत हिंदुराव सूर्यवंशी व चंद्रकांत गणपती कणसे यांचा समावेश आहे.

महादेव पाटील म्हणाले, बाजार समितीच्या विस्तारित बेदाणा मार्केटचे बांधकाम सांगली येथील कुबेरा कन्स्ट्रक्शन यांना देण्यात आले. या कामासाठी देखरेख करण्यासाठी सांगली येथील चौगुले-पाटील कन्सलटंटचे प्रमोद पारीख यांची नेमणूक करण्यात आली. संबंधित संचालक मंडळ, सचिव व प्रशासक यांनी सन 2014 पासून ते 18 एप्रिल 2019 अखेर वेळोवेळी असे नऊ वेळा मिळून 12 कोटी 9 लाख 80 हजार इतकी रक्कम अ‍ॅडव्हान्स म्हणून ठेकेदार कुबेरा कन्स्ट्रक्शनचे संचालक मोतीलाल पारीख यांना दिली. प्रत्यक्षात बाजार समितीच्या झालेल्या बांधकामाचे मोजमाप केले असता त्या कामाचे 7 कोटी 57 लाख 92 हजार रुपये होतात. त्यामुळे झालेल्या कामापेक्षा 4 कोटी 91 लाख 87 हजार रुपये जादा रक्कम ठेकेदाराला देऊन संगनमताने घोटाळा केला असल्याचे लेखापरीक्षक यांच्या अहवालात समोर आले आहे.

गेल्या चौदा वर्षात संबंधित संचालक मंडळ, सचिव व प्रशासक यांना काम पूर्ण करणे शक्य झाले नसल्याने बाजार समितीचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. या नुकसानीस जबाबदार का धरू नये, अशी विचारणा विशेष लेखापरीक्षकांनी केली आहे. 21 सप्टेंबर 2022 पर्यंत खुलासा करावा, अन्यथा कारवाई केली जाईल, असे नोटिशीत म्हटले असल्याचे पाटील यांनी सांगितले.

यांची काही प्रकरणातून सुटका

तत्कालीन संचालक सुखदेव पाटील, कुमार शेटे, रवींद्र पाटील, संपतराव सूर्यवंशी, राजाराम पाखरे यांनी संचालक मंडळाच्या ज्या-ज्या सभेत विरोध केला आहे, त्या-त्या मुद्यांच्या बाबतीत (रकमेच्या बाबत) त्यांना जबाबदार धरले नसले तरी अन्य सभेच्या कामाकाजाबाबत त्यांना जबाबदार धरले आहे. त्यामुळे या संचालकांमध्ये ‘कभी खुशी कभी गम’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.

Back to top button