क्रांतीगाथा’ क्रांतिअग्रणींची : शेतकरी कर्जमुक्तीचा रचला पाया | पुढारी

क्रांतीगाथा’ क्रांतिअग्रणींची : शेतकरी कर्जमुक्तीचा रचला पाया

सांगली प्रतिनिधी :  आज शेतकर्‍यांच्या कर्जमुक्तीसाठी प्रत्येक शासन फुकाचा कळवळा दाखवते. प्रत्येकजण शेतकर्‍यांच्या कर्जमुक्तीची ‘राजकीय कापणी’ करण्यासाठी धडपडताना दिसतायत. पण या राज्यातील नव्हे तर संपूर्ण देशातील शेतकर्‍यांच्या कर्जमुक्तीचा पाया क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड आणि त्यांच्या सहकार्‍यांनी रचला होता, याची आज अनेकांना जाणीवही नाही…

जी. डी. बापू आणि सहकार्‍यांनी इंग्रजांविरोधात लढताना हातात शस्त्र घेतले. हे करताना त्यांना व त्यांच्या सहकार्‍यांना एकाचवेळी
परकीयांशी आणि स्वकीयांशीही झुंज द्यावी लागत होती. एकीकडे इंग्रज आणि दुसरीकडे सामान्य रयतेवर अन्याय करणार्‍यांना धडा शिकविण्यास प्रतिसरकारच्या शिलेदारांनी सुरूवात केली. यातूनच या भूमीगतांकडून रयतेच्या अपेक्षा वाढू लागल्या!
तत्कालीन काळात गावागावात अनेक सावकार, गावगुंड अन्याय करीत होते, महिलांवर अत्याचार करत होते. त्यांना ब्रिटिशांचे पाठबळ
होते. अगदी गावातील तंटे, भांडण, वाद विवाद यांचा निकाल हे गावटगेच देत होते. त्यातून एखाद्यावर अन्याय झाला तरी त्याला वर
दाद मागता येत नसे. कारण ब्रिटिशांचे या लोकांना पाठबळ होते. परिणामी हे गावटगे अधिकच उन्मत्त झाले होते. लोकांचा भूमीगतांना, क्रांतीकारकांना पाठिंबा होता. त्यांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी जी. डी. बापू आणि त्यांच्या सहकार्‍यांनी आधी या टग्यांचा बंदोबस्त करण्याचा निश्चय केला. यातूनच सामान्य लोकांची देखील मानसिकता बदलू लागली. आपल्यावर झालेल्या अन्यायाची दाद मागण्यासाठी ते भूमीगत क्रांतीकारकांकडे येऊ लागले.

ऑगस्ट 1942 पासूनच ब्रिटिशांची देशातील सत्ता उलथून टाकण्यासाठी अनेक भूमीगतांचे गट तयार झाले होते. या सार्‍यांचे नियंत्रण, स्वरुप यांची निश्चिती करण्यासाठी पहिल्या टप्प्यात कुंडल येथे क्रांतसिंह नाना पाटील यांच्या उपस्थितीत एक महत्वाची बैठक झाली होती. नाना पाटील यांचा उजवा हात म्हणूनच जी. डी. बापू हे काम करत होते. यावेळी ब्रिटिशांच्या विरोधात कसे काम करायचे, ग्रामीण भागात आपली सत्ता कशी निर्माण करायची, यासाठी काय आणि कशी व्यवस्था असावी याचे धोरण यावेळी निश्चित करण्यात आले. त्यासाठीची घटना किंवा रुपरेषा निश्चित करण्यात आली नव्हती. तरी देखील सातारा जिल्ह्यात अनेक भागात भूमीगत क्रांतीकारक ब्रिटिशांच्या सत्तेविरोधात सातत्याने कारवाया करत होते. तसेच ब्रिटिशांच्या सत्तेच्या आश्रय, आधाराने जे लोक सामान्य रयतेला छळत
होते, त्यांचा पध्दतशीर बंदोबस्त केला जात होता.

नाना पाटील यांनी आपल्या विचाराचे सहकारी, भूमीगत क्रांतीकारक यांच्या मदतीने सातारा जिल्ह्यात प्रतिसरकार स्थापन केले. याची निश्चित घटना, कार्याचे स्वरुप, त्याची रुपरेषा ठरविण्यासाठी ऑगस्ट 1943 मध्ये पणुंब्रे ( ता. शिराळा ) येथे बैठक बोलावली. जी. डी. बापू लाड, नाथाजी लाड, धन्वंतरी वैद्य, नागनाथअण्णा नायकवडी, बाबुराव चरणकर, किसन अहीर, पांडूतात्या बोराडे, घोरपडे मास्तर, वाय. सी. पाटील, डी. जी. देशपांडे, दत्तोबा लोहार, बापूराव जगताप आदी क्रांतीकारक बैठकीस उपस्थित होते.

ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेपासून रयतेची सुटका करणे हाच प्रतिसरकारचा उद्देश होता. याच बैठकीत न्यायदान मंडळाची देखील स्थापना करण्यात आली. या मंडळावर क्रांतीकारकांचे नियंत्रण राहणार होते. तसेच भूमीगत कार्यकर्त्यांमधून कार्यकारिणीची रचना
करून त्यातून डिक्टेटर, गटनायक, गटउपनायक, सुपरवायझर अशी पदे निर्माण करण्यात आली होती. नाना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यात जी. डी. बापू लाड यांच्यावर मोठीच जबाबदारी होती. बापूंनी ती समर्थपणे पेलली देखील!

भुमीगतांच्या कार्यक्षेत्रानुसार सातारा जिल्ह्यात 18 गट तयार करण्यात आले होते. यात कुंडल गटामध्ये न्यायदान मंडळाचे प्रमुखपद जी. डी. बापूंच्याकडे देण्यात आले होते. तसेच उपप्रमुख म्हणून ईश्वरा लाड यांची निवड करण्यात आली. या गटात बापूंच्यासह त्यांचे भाऊबंद, आप्पासाहेब लाड गुरुजी, नाथाजी लाड, बाबुराव लाड, शंकर केशव लाड. रामचंद्र श्रीपती लाड, शामराव यशवंत लाड, आप्पा चंद्रा लाड, विठ्ठल केशव लाड, बंडू दाजी लाड, ईश्वरा बळवंत लाड, सुब ज्ञानू लाड, ज्ञानू पांडुरंग लाड, विष्णू चंद्रा लाड, तुकाराम मसू लाड आदी
मंडळींची यात मोठी भूमिका आणि जबाबदारी होती. जी. डी. बापू लाड यांच्या नेतृत्वाखाली हे न्यायदान मंडळ समाजातील अत्याचार पिडितांना आधार देऊ लागले. खर्‍या अर्थाने लोकांना आपले सरकार आल्याचे वाटू लागले. मात्र ब्रिटिशांच्या सत्तेची पाळेमुळे
गावागावात घट्ट झाली होती. ती गावागावातील पाटील, कुलकर्णी, तलाठी यांच्यामुळे! कारण हे वतनदार लोकच ब्रिटिशांना गावपातळीवर ताकद देत होते. यातूनच या वतनदारांना वतनांचे राजीनामे देण्यास भाग पाडण्याचा कार्यक्रमच भूमीगत कार्यकर्त्यांनी सुरू केला. त्यांना लोकांचे देखील चांगले सहकार्य मिळू लागले. जी. डी. बापूंनी आपल्या कुंडल गावातूनच सावकाराचा बिमोड करण्यास सुरवात केली.

पतीने सोडून दिलेली एखादी महिला, तिचे नांदणे मार्गी लागले पाहिजे, अशी मागणी करू लागली. शिवारातील कापणीला आलेले पीक
चोर रानात ठेवत नसत, ते कापून नेत. मळ्यात शेतकर्‍यांनी ठेवलेली शेतीची अवजारे चोरून नेली जात असत. असे सारे प्रकार बंद करा अशा मागण्या, साकडे या भूमीगतांना घालण्यात येऊ लागले. यातून हे गावटगे सामान्यांवर किती अन्याय करत आहेत याची जी. डी. बापूंना कल्पना येऊ लागली. सर्वच भूमीगत संघटनांनी अशा चोरांच्या विरोधात, बायका न नांदवणार्‍या
नवर्‍यांच्या विरोधात, सामान्य रयतेवर अन्याय, अत्याचार करणारे सावकार, जमीनदार, गावगुंड, दरोडेखोर, फरारी यांच्या विरोधात मोहिमच उघडली.

जी. डी. बापू गावात असताना त्यांना भेटण्यासाठी मोठी गर्दी होत असते. ते देखील लोेकांच्या समस्या, अडचणी, तक्रारी ऐकून घेत!
जानेवारी 1944 मध्ये त्यांनी गावातीलच एका सावकाराला धडा शिकविला. या सावकाराने अनेकांना कर्जे दिली होती. त्याच्या वसुलीसाठी
सावकार लोकांची घरेदारे, शेतीवाडी आपल्या न नावावर लिहून घेत असे. बापूंनी या सावकाराकडून सार्‍यांची कजर्र् फिटली आहेत असे लिहून घेतले. जप्तीसाठी आलेल्या बेलिफाची साक्षीदार म्हणून सही घेतली. खरे तर राज्यातील नव्हे तर संपूर्ण देशातील शेतकरी कर्जमुक्तीचा हा पहिला यशस्वी प्रयोग म्हणावा लागेल. यातूनच जी. डी. बापूंनी सावकारीमुक्त स्वातंत्र्य असाच कार्यक्रम जाहीर
केला. परिणामी लोकांना, पिडितांना ब्रिटिशांपेक्षा भूमीगतांची सत्ता, प्रतिसरकार हे आपले वाटू लागले.

या चळवळीला लोकांचा पाठिंंबा वाढू लागला. प्रतिसरकाची व्याप्ती वाढु लागली, तशी पैशाची मागणी, गरज वाढत गेली. हा लागणारा पैसा कसा उपलब्ध करायचा यावर भूमीगतांच्या गटांत चर्चा होऊ लागली. जी. डी. बापूंचे स्वातंत्र्यलढ्यातील गुरू क्रांतीसिंह नाना
पाटील होते.

Back to top button