सांगली : कवलापुरात विद्यार्थ्याच्या अंगावर पेट्रोल ओतले | पुढारी

सांगली : कवलापुरात विद्यार्थ्याच्या अंगावर पेट्रोल ओतले

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  कवलापूर (ता. मिरज) येथे इयत्ता अकरावीतील विद्यार्थ्याच्या अंगावर पेट्रोल ओतण्यात आले. पंडित नेहरू विद्यालयासमोर शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता हा धक्कादायक प्रकार घडला. यावेळी दोन गटात किरकोळ मारामारीही झाली.
विद्यालयातील माध्यमिक वर्गही सुटल्याने विद्यार्थी-विद्यार्थिनी बाहेर पडले होते. हा प्रकार पाहून विद्यार्थ्यांची भितीने चांगलीच पळापळ झाली.

या घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलिस दाखल झाले. त्यांनी विद्यालयाजवळ चौकशी केली. मात्र पोलिसांना पाहून परिसरातील काहींनी दुकानेही बंद केली. तेथील रहिवाशांकडे चौकशी केली. पण घडलेल्या प्रकाराबद्दल कोणीही तोंड उघडले नाही. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता. परंतु मारामारी झाल्याची कच्ची नोंद पोलिस दप्तरी झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, रयत शिक्षण संस्थेचे कवलापुरात पंडित नेहरू विद्यालय आहे. पाचवी ते बारावीपर्यंत विद्यार्थी शिक्षण घेतात. दुपारी चार वाजता महाविद्यालय सुटते. पाच वाजता माध्यमिकचे वर्ग सुटतात. याच महाविद्यालयात व्यवसाय अभ्यासक्रम विभागात शिक्षणारा विद्यार्थी सायंकाळी पाच वाजता विद्यालयाच्या गेटजवळ टोळके करून उभा होता. गावातील एक व्यक्ती या टोळक्याला दररोज पाहते. अनेकदा मुलींच्या छेडछाडीचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे या व्यक्तीने एका विद्यार्थ्यास ‘इथे का थांबला आहे’, अशी विचारणा केली. यावर या विद्यार्थ्याने ‘पेट्रोल आणण्यास आलो आहे’, असे उत्तर दिले. संबंधित व्यक्तीने ‘पेट्रोल इथं मिळतय काय, पंपावर जाऊन आण जा की’, असे सांगितले. यातून त्यांच्यात वाद वाढत गेला. त्याचे पर्यवसान मारामारीत झाले. या व्यक्तीने तिथे खणीत एका घरात पेट्रोल विक्री केली जाते. तेथून बाटली भरून पेट्रोल आणून त्या विद्यार्थ्याच्या अंगावर ओतले. या घटनेने प्रचंड तणाव निर्माण झाला. नागरिकांनी मोठी गर्दी केली. विद्यार्थ्यांची भितीने पळापळ झाली. काहींनी मध्यस्थी करून हा वाद मिटविल्याने पुढील अनर्थ टळला.

शिक्षकांचा दबदबा गेला कुठे?

पंडित नेहरू विद्यालयाचा खूप लौकिक आहे. शिक्षकांचा खूप दबदबा होता. पण गेल्या काही वर्षात शाळेतील शिस्त बिघडली असल्याचे चित्र आहे. बाहेरचे तरुण येऊन दहशत माजवित आहेत. मुलींच्या छेडछाडीचे प्रकार घडत असल्याने शिक्षकांचा दबदबा गेला कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

तक्रार आली तर गुन्हा दाखल करू : पोलिस

भरदिवसा घडलेल्या या घटनेबाबत ग्रामीण पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. त्यावेळी पोलिसांनी सांगितले की, मारामारी सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिस गेले होते. चौकशी केली तर कोण काहीच सांगत नाही. कोणी तक्रार दाखल केली तर गुन्हा दाखल करून संबंधितावर कारवाई केली जाईल.

Back to top button