सांगली : महापालिका क्षेत्रातील मालमत्तांचे सर्वेक्षण | पुढारी

सांगली : महापालिका क्षेत्रातील मालमत्तांचे सर्वेक्षण

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  महापालिका क्षेत्रातील नागरिकांना अधिकाधिक सोईसुविधा पुरवणे आवश्यक आहे. पण त्यासाठी पालिकेचे उत्पन्न वाढणे गरजेचे आहे. विकासकामांबरोबरच उत्पन्न वाढीवर भर राहील. घरपट्टीसंदर्भात महापालिका क्षेत्रातील मालमत्तांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. घरपट्टी आकारणी होत नसलेल्या मालमत्तांचा शोध घेतला जाणार आहे, अशी माहिती आयुक्त सुनील पवार यांनी दिली.

ते म्हणाले, पालिकेची आर्थिक स्थिती बेताची आहे. उत्पन्न वाढणे गरजेचे आहे. यासाठी विविध पर्यायांवर प्रशासन गांभीर्याने विचार करत आहे. करवाढ करून नागरिकांवर बोजा टाकला जाणार नाही, पण उत्पन्नातील गळती शोधून ती बंद केली जाईल. महापालिका क्षेत्रात प्रत्यक्षात मालमत्ता जास्त आहेत, पण नोंदणी कमी असावी. नोंदणी न केलेल्या मालमत्तांचा कर बुडत आहे. अशा मालमत्तांचा शोध घेऊन त्यांना कर आकारणी केली जाईल. त्यासाठी मालमत्तांचे सर्वेक्षण आवश्यक आहे. खासगी एजन्सीद्वारे मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याचा विचार आहे. कर न लागणार्‍या मालमत्ता समोर येतील. त्याचबरोबर सर्व मालमत्तांचे मोजमाप घेतले जाईल. प्रथम प्रायोगिक तत्वावर एक हजार घरांचे सर्वेक्षण व त्यानंतर तीनही शहरातील सर्व मालमत्तांचा सर्वेक्षण करण्याचा विचार आहेे.

पवार म्हणाले, पालिका क्षेत्रात मोकाट कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रणासाठी नसबंदी हा पर्याय आहे. नवीन अद्यावत मुख्यालय इमारतीसाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे.

शेरीनाल्याच्या प्रश्न सोडवू : पवार

आयुक्त पवार म्हणाले, शेरीनाल्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासूनचा आहे. शेरीनाल्याचे पाणी प्रक्रिया न होता थेट नदीत मिसळते. नदीचे प्रदूषण होत आहे. महापालिकेला प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नोटीसही आलेली आहे. त्यामुळे हा प्रश्न सोडवण्यासाठी एसटीपी बांधून ते कार्यान्वित केले जाणार आहे.

Back to top button