सांगली; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी मंगळवारी भाजपतर्फे धीरज सूर्यवंशी, तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतर्फे काँग्रेसचे संतोष पाटील व फिरोज पठाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज माघार व मतदान बुधवारी आहे. भाजपचे उमेदवार धीरज सूर्यवंशी यांचा विजय निश्चित मानला जात आहे. राष्ट्रवादीच्या एक सदस्य भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. काँग्रेस व राष्ट्रवादीला धक्का देण्याची जुळणी भाजपने केली आहे.
स्थायी सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी बुधवारी सकाळी 11.30 वाजता स्थायी समितीची विशेष सभा सुरू होणार आहे. उमेदवारी अर्जांची छाननी, वैध अर्जांची प्रसिद्धी व उमेदवारी अर्ज माघारीनंतर लगेचच मतदान होईल. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत होती. भाजपचे उमेदवार धीरज सूर्यवंशी यांनी दुपारी बारा वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला. आमदार सुधीर गाडगीळ, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, महापालिकेचे सभागृह नेते तथा भाजपचे गटनेते विनायक सिंहासने, समाजकल्याण सभापती सुब्राव मद्रासी, महिला व बालकल्याण सभापती गीतांजली ढोपे-पाटील, माजी महापौर गीता सुतार, युवराज बावडेकर, अनारकली कुरणे, भारती दिगडे, सविता मदने, सुजित राऊत, गजानन साळुंखे व नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपचे 8 सदस्य मंगळवारीही महाबळेश्वर येथेच होते. त्यांच्यासमवेत भाजपचे नेते शेखर इनामदार, माजी आमदार दिनकर पाटील, सुरेश आवटी हे होते. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर उमेदवार धीरज सूर्यवंशी हेही महाबळेश्वरला गेले. भाजपचे सर्व 9 नगरसेवक सकाळी प्रथम सांगलीवाडीत व नंतर सांगलीत महापालिकेत येणार आहेत.
महापालिकेच्या स्थायी समितीत भाजपचे संख्याबळ 9, तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे संख्याबळ 7 आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे संख्याबळ दोनने कमी करण्याच्या प्रयत्नात भाजपला बर्यापैकी यश आल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या एक सदस्य भाजपच्या संपर्कात आहे, तर भाजप संपर्कातील अन्य एक सदस्य काँग्रेसची की राष्ट्रवादीची?, अशीही चर्चा सुरू आहे. नेमके किती आणि कोणत्या पक्षाचे सदस्य भाजपच्या संपर्कात आहेत, हे बुधवारी निवडणुकीत स्पष्ट होईल, असेही भाजपच्याच एका नेत्यांनी सांगितले.
भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे म्हणाले, महापालिकेतील स्थायी ही महत्वाची समिती आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून स्थायी समिती सभापतीपदासाठी धीरज सूर्यवंशी यांचे नाव आले. त्यानुसार सूर्यवंशी यांचा उमेदवारी अर्ज भरला आहे. महापालिकेत भाजपला जनमताचा स्पष्ट कौल असतानाही महापौर निवडणुकीत विरोधकांनी घोडेबाजार करून भाजपची सत्ता काढून घेतली. मात्र स्थायी समितीच्या गेल्या चार निवडणुकीत भाजपचाच विजय झाला आहे. यावेळीही धीरज सूर्यवंशी यांचा विजय निश्चित आहे. उर्वरीत वर्षभरात केंद्र, राज्यातून मोठ्या प्रमाणावर निधी आणून सांगली, मिरज आणि कुपवाड या तीनही शहरांचा विकास साधणार आहोत. आमदार सुधीर गाडगीळ, मंत्री सुरेश खाडे आणि महापालिका स्थायी समितीच्या माध्यमातून वर्षभरात होणार्या विकासकामांच्या जोरावर महापालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित आहे.
काँग्रेसचे गटनेते संजय मेंढे म्हणाले, स्थायी समिती सभापतीपदासाठी पाटील व पठाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नेत्यांशी चर्चा करून एक उमेदवारी अर्ज माघार घेतला जाईल. आघाडीचे संख्याबळ 7 आहे. ही निवडणूक काँग्रेस लढवणार आहे. राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान म्हणाले, स्थायी सभापती निवडणुकीत काँग्रेससोबत राष्ट्रवादी आहे. राष्ट्रवादीच्या तीनही सदस्यांचे मतदान काँग्रेसच्या उमेदवाराला होईल. भाजपमधील नाराज सदस्य कोणतीही भूमिका घेऊ शकतात. त्यामुळे निवडणुकीत काहीही घडू शकते. भाजपच्या नाराज सदस्यांनी मदत केली तर नाकारली जाणार नाही.
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतर्फे काँग्रेसचे सदस्य संतोष पाटील व फिरोज पठाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. संतोष पाटील यांच्या उमेदवारी अर्जाला रोहिणी पाटील सूचक, तर शुभांगी साळुंखे अनुमोदक आहेत. फिरोज पठाण यांच्या उमेदवारी अर्जाला डॉ. सय्यद नर्गिस सूचक, तर संगीता हारगे अनुमोदक आहेत. उमेदवारी अर्ज भरताना काँग्रेसचे गटनेते संजय मेंढे, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, अमर निंबाळकर उपस्थित होते. काँग्रेस व राष्ट्रवादीचा एकही नेता उपस्थित नव्हता. बुधवारी पठाण यांचा अर्ज मागे घेतला जाईल व संतोष पाटील यांचा अर्ज राहील, असे संकेत मिळत आहेत.
स्थायी समितीत भाजपचे 9 आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे 7 सदस्य आहेत. भाजपचे बहुमत आहे. सभापतीपदाच्या उमेदवारीसाठी भाजपमध्ये 4 सदस्य इच्छुक आहेत. अखेर उमेदवारी मिळवण्यात धीरज सूर्यवंशी यांनी बाजी मारली. भाजपने सूर्यवंशी यांचे 4 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. प्रत्येक अर्जावर एक सूचक व एक अनुमोदक याप्रमाणे सर्व 8 सदस्यांना सूचक, अनुमोदक केले आहे. नाराज सदस्यांची नाकेबंदी केली आहे. राज्यात, केंद्रात भाजपची सत्ता असल्याने नाराज सदस्याचे बंड थंड झाल्याची चर्चा जोरात आहे.