सांगली: जत तालुक्यात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची कोट्यवधीची फसवणूक | पुढारी

सांगली: जत तालुक्यात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची कोट्यवधीची फसवणूक

जत; विजय रुपनूर : जत तालुक्यातील दक्षिण भागातील बिळूर, उमराणी, खोजनवाडी, साळमाळगेवाडी, डफळापूर, मिरवाड यासह पूर्व भागातील उमदी या भागातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची दरवर्षी कोट्यवधी रुपयांची फसवणूक होत आहे. दलालामार्फत व्यापारी तालुक्यातील द्राक्षमाल उचलतात व मुदत मागून घेतात. नंतर कोल्ड स्टोरेजला माल आहे, असे अनेकविध कारणे सांगून शेतकऱ्यांना पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर व दलालांवर प्रशासन व पोलीस यंत्रणेचा वचक नाही. पैसे आज, उद्या मिळेल, या आशेवर शेतकरी पोलिसांत तक्रार करण्यास पुढे येत नाहीत.

तर फसवणूक झाल्यानंतर दाद कोणाकडे मागायची, याबाबत शेतकरी अनभिज्ञ असल्याचे दिसून येते. तक्रार करूनही न्याय मिळेल, याबाबत साशंकता असल्याने शेतकरी दाद मागायचे धाडस करत नाही. त्यात पोलीस यंत्रणा फसवणूक केल्याबाबतचे ठोस पुरावे मागते. व्यापारी धनादेश देतात. परंतु त्यांच्या बँक खात्यावर कोणतेही रक्कम नसल्याचे दिसून येते. कायदेशीर प्रक्रियेमध्ये शेतकरी हात आकडता घेतात. यामुळेच व्यापारी, दलाल आणि मध्यस्थांची अभद्र साखळी तालुक्यात निर्माण झाली आहे. यापूर्वी फसवणूक करणाऱ्यावर कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई झालेली नाही. यामुळे दलालांचे फावले आहे.

यावर्षी मार्च, एप्रिल या महिन्यात द्राक्ष हंगामात साळमळगेवाडी येथील रायाप्पा मनगेनी कित्तुरे (१ लाख ३७ हजार), जकराया माणिक कितुरे (१ लाख ६० हजार), बंडू आप्पासो कित्तुरे (३ लाख ९२हजार ) रावसाहेब बाबासाहेब कितूरे (९० हजार), उत्तम हनमंतगिरी बुवा (१ लाख ३९ हजार), जालिंदर सखाराम पवार (२५ हजार), भरमान्ना बाबासो कीतूरे (२ लाख ५१ हजार), बिरोबा मायाप्पा कितुरे (९४ हजार), गोरख बाबू पवार (१ लाख ८० हजार), डफळापूर येथील रमेश दत्तात्रय कुंभार (२ लाख), मिरवाड येथील रावसाहेब ज्ञानोबा लवटे (२ लाख ३० हजार), राजू बाबासो खांडेकर (१ लाख ३५हजार), घडाप्पा लवटे (१लाख ५३ हजार), बिळूर येथील सुभाष कृष्णाप्पा करेनवर (३ लाख २० हजार) या १४ शेतकऱ्यांनी जत पोलीस ठाण्याकडे फसवणूक झाल्याबाबतचा अर्ज दिला आहे. याबाबत चौकशी सुरू आहे परंतु अद्याप फसवणूक झालेली रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही. याबाबत आगामी द्राक्ष हंगामात त शेतकऱ्यांची फसवणूक टाळावी, याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे.

थेट उत्पादकांचा शेतीमाल, फळे घेण्यासाठी परवाना आवश्यक

थेट उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावरील शेतीमाल व द्राक्षे, डाळिंब यासारखे पिके खरेदी घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाची परवाना बंधनकारक आहे. महाराष्ट्रात असे परवाने फक्त १ हजार ४५० व्यापाऱ्यांनी घेतले आहेत. ९० टक्के व्यापारी विनापरवाना शेतीमाल व फळबागा खरेदी करत असल्याचे विदारक चित्र आहे. सदरचा खरेदी केंद्र व व्यापारी यांना परवाना पुणे येथील पणन संचालकांकडून घेणे बंधनकारक आहे. सदरची प्रक्रिया वेळखाऊ असल्याने सहसा हा परवाना व्यापारी घेत नाहीत. परंतु याचा दुरुपयोग करत असल्याचे चित्र आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यातील खरेदी केंद्र व व्यापाऱ्यांना परवानासाठी कोल्हापूर केंद्र असावे, अशी मागणी शेकऱ्यांतून होत आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती मधील अडत, खरेदी- विक्री केंद्र यांच्याकडील शेतीमाल, फळ पिके यांची खरेदी करायची असेल. तर त्याकरीता व्यापाऱ्यांना सिंगल मार्केट लायसन्स दिले जाते. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या बांधावरील शेतीमाल व फळ पिके खरेदी करण्याकरीता थेट पणन परवाना दिला जातो. याकरिता ऑनलाइन, व ऑफलाइन अर्ज करावा लागतो. तरी शेतकऱ्यांनी परवानाधारक व्यापाऱ्याना शेतीमाल, फळ पिकांची विक्री करावी.
– ए. आर. पाचोरे, सहायक संचालक, कृषी पणन मंडळ पुणे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button