सांगली : गुहागर – विजापूर महामार्गावर भेगा | पुढारी

सांगली : गुहागर - विजापूर महामार्गावर भेगा

कडेगाव; संदीप पाटील :  कडेगाव तालुक्यात चार वर्षांपासून विजापूर – गुहागर महामार्गाचे काम सुरू आहे. अद्यापही हे काम काही ठिकाणी सुरू आहे तोपर्यंत ठिकठिकाणी रस्त्यावरील सिमेंट जाऊन खड्डे पडू लागले आहेत. काही ठिकाणी महामार्गावर भेगा पडू लागल्या आहेत. त्यामुळे या महामार्ग कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, चार वर्षांतच हा रस्ता खराब झाल्याने पुढील पन्नास वर्ष कसा काय टिकणार, असा जळजळीत सवाल सध्या प्रवांशासह ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. सध्या या महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रवासी व सर्वसामान्य जनतेतून तीव्र प्रतिकिया उमटू लागल्या आहेत.

काम राष्ट्रीय महामार्गाचे असूनही त्याची गुणवता त्या दर्जाची नसल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. तसेच काम घाईगडबडीत उरकण्याच्या हेतूने महामार्गावर सध्या अनेक ठिकाणी चढ- उतार झाले आहेत. यामुळे या महामार्गावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच काही ठिकाणी महामार्गालगतच्या साईटपट्ट्याही खराब होऊ लागल्या आहेत. याचाही प्रवाशांना त्रास होऊ लागला आहे.

सध्या महामार्गावर काही ठिकाणी दिशादर्शक फलक नाहीत. यामुळे या मार्गावर रात्री – अपरात्री किरकोळ व गंभीर स्वरूपांचे अपघात होत आहेत. या रस्त्याची देखभाल दुरुस्ती ठेकेदाराकडे चार वर्षे असणार आहे. परंतु सध्या काम होऊन काही दिवसच होत आहेत तोच महामार्गावर काही ठिकाणी खड्डे व भेगा पडू लागल्या आहेत. परिणामी पुढील पन्नास वर्ष हा रस्ता कसा टिकणार, असा सवाल केला जातो आहे. हा महामार्ग आत्ताच खराब होऊ लागल्याने शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत, याला जबाबदार कोण, असा सवाल सर्वसामान्य जनतेतून होत आहे.

रस्त्याची गुणवत्ता तपासणी गरजेची

सध्या महामार्गाचे काम काही ठिकाणी सुरू आहे तोपर्यंत महामार्गावरील सिमेंट जाऊन खड्डे पडू लागले आहेत. तर काही ठिकाणी महामार्गावर भेगा पडू लागल्या आहेत. त्यामुळे कामाच्या दर्जाबाबत संशय व्यक्त होत आहे.

Back to top button