सांगली : गणेश मूर्तीवरील सव्वा लाखाचा हार लंपास | पुढारी

सांगली : गणेश मूर्तीवरील सव्वा लाखाचा हार लंपास

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  येथील वडर कॉलनीतील सर्वोदय गणेश उत्सव मंडळाच्या मूर्तीवरील अडीच तोळ्यांचा सोन्याचा हार चोरट्याने लंपास केला. सध्याच्या बाजारभावाने या हाराची किंमत सव्वा लाखाच्या आसपास आहे. दि. 2 सप्टेंबर रोजी चोरीचा हा प्रकार घडला. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दुसर्‍या दिवशीही रात्रीच्यावेळी मंडपाच्या पडद्यातून हात घालून मूर्तीवरील दागिने चोरीचा प्रयत्न करणार्‍या नीलेश हरी धोत्रे (वय 22, रा. गुजाळ वस्ती, आळंदी रोड, पुणे) याला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडून बेदम चोप दिला. त्याला विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणी मंडळाचे राजू आण्णाप्पा नाईक (वय 50, रा. सर्वोदय हायस्कूलजवळ, वडर कॉलनी, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे.

सर्वोदय गणेशोत्सव हे खूप जुने मंडळ आहे. मंडळाकडून दरवर्षी मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदाही त्यांनी भव्य मंडप उभा करून गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. आकर्षक विद्युत रोषणाईही केली असून मूर्तीवर सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा साज चढविला आहे. दि. 2 सप्टेंबर रोजी मंडपाचा पडदा झाकून कार्यकर्ते स्टेजवर झोपले होतेे. मध्यरात्री चोरट्यांनी पडद्याच्या कोपर्‍यात हात घालून मूर्तीवरील अडीच तोळ्यांचा सोन्याचा हार लंपास केला.

दुसर्‍यादिवशी हा प्रकार उघडकीस आला. मात्र, कार्यकर्त्यांनी पोलिसात तक्रार दिली नाही. पुन्हा असा प्रकार घडू नये, यासाठी उपाययोजना करण्याचे कार्यकर्त्यांनी ठरविले. त्याचदिवशी मंडपात व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले. रात्री मूर्तीच्या सुरक्षेसाठी कार्यकर्त्यांची सुरक्षा वाढविली.

याचदिवशी रात्री मंडपाचा पडदा झाकलेला होता. त्यावेळी या पडद्याच्या कोपर्‍यात हात घालून चोरट्याने पुन्हा दागिने चोरण्याचा प्रयत्न केला. एक कार्यकर्ता जागा होता. त्याने हा प्रकार पाहिला. त्याने आरडाओरड केली. त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी चोरट्याला पकडून त्याला बेदम चोप दिला. विश्रामबाग पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी चोरट्याला ताब्यात घेतले. चौकशीअंती त्याचे नाव निलेश धोत्रे असल्याचे समजले. पोलिसांनी राजू नाईक यांची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल केला.

दि. 2 सप्टेंबर रोजी सोन्याचा हार त्याने लंपास केला असण्याची शक्यता आहे. मूर्तीवर खूप दागिने असल्याचे त्याने पाहिले होते. कदाचित दुपारी तो तिथे येऊन गेला असण्याची शक्यता आहे. धोत्रे हा सराईत गुन्हेगार आहे का?. त्याच्याविरूद्ध पुणे पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत का? याची माहिती पोलिस घेत आहेत.

दरम्यान, पोलिसांनी शहर व परिसरातील मंडळाच्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन मंडप परिसरात रात्री गस्त वाढविण्याची सूचना केली. रात्री दररोज मूर्तीजवळ किमान दोन कार्यकर्ते मुक्कामास ठेवावेत, अशी सूचना त्यांनी केली. पोलिसही रात्री सर्व मंडळाच्या मंडपस्थळी भेट देऊन कार्यकर्ते आहेत की नाही, याची पाहणी करीत आहेत.

Back to top button