सांगली : गांधीजी असते तर त्यांना खूप वेदना झाल्या असत्या : तुषार गांधी | पुढारी

सांगली : गांधीजी असते तर त्यांना खूप वेदना झाल्या असत्या : तुषार गांधी

सांगली; पुढारी वृत्तसेवा : देशातील भितीदायक परिस्थिती पाहता महात्मा गांधीजी आज असते तर त्यांना खूप वेदना झाल्या असत्या. आपण स्वातंत्र्य कशासाठी मिळविले, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर निर्माण झाला असता, अशी व्यथा महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी व्यक्त केली. लोकांनी लोकशाहीशी गद्दारी केल्याने त्यांना अशा भयावह प्रसंगाला तोंड द्यावे लागत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

सांगली येथील शांतिनिकेतन विद्यापीठात क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी आमदार अरुणअण्णा लाड, डॉ. बाबूराव गुरव, ज्येष्ठ विचारवंत ज्ञानेश महाराव, किरण लाड उपस्थित होते. प्रथम स्मृतीस्तंभाचे पूजन करून महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार करण्यात आला. गांधी म्हणाले, आपण जुन्या इतिहासाचा उत्सव किती दिवस साजरा करणार आहोत. आदर्श व्यक्तीमत्वे फक्त इतिहासातच का मिळतात, ती आता का निर्माण होत नाहीत, आपण नवीन इतिहास का निर्माण करू शकत नाही? कारण आजचे मतदार लोकशाहीशी गद्दारी करीत आहेत. त्यामुळे त्यांना अशा प्रसंगांना तोंड द्यावे लागत आहे. हीच आपल्या लोकांची पात्रता आहे. आज खर्‍या अर्थाने प्रतिसरकारची गरज आहे, कारण सध्याच्या सत्तेतील लोक स्वातंत्र्य चळवळीऐवजी इंग्रजांसोबत होते. आजही आपण पाणी पिण्यावरून मागासवर्गीयांवर अत्याचार करतो. बिल्कीस बानोवरील अत्याचार्‍याच्या विरोधात उभे राहत नाही. जात, धर्म, लिंग, भाषा अशा प्रत्येक गोष्टीत भेदाभेद निर्माण करून जातीय द्वेषाची पेरणी केली जात आहे. यातून कसली लोकशाही दिसून येते? ही तर राजेशाही, हुकूमशाही आहे. ज्येष्ठ विचारवंत ज्ञानेश महाराव म्हणाले, आपण सर्व हिंदूच आहोत, पण त्याचा डंका वाजवायची गरज नाही. गायीचे शेण खायला लावणारे चुकीचे हिंदुत्व मांडत आहेत. ज्या देशात माणसापेक्षा दगडाला जास्त किंमत असते, तो देश कधीच महासत्ता होऊ शकत नाही.

ते पुढे म्हणाले, शिवरायांना कोण्या देवाने नाही तर त्यांच्या आई जिजाऊंनी घडविले. पण भवानी देवीची कृपा असल्याचा खोटा इतिहास सांगत त्यांना देवत्व देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातून शिवरायांचा पराक्रम नाकारण्याचा इतिहास बिंबविला जात आहे. समाजात जो जितका धार्मिक वागतो तो तितका बदमाश असतो. मनाचा निग्रह असेल तर कुंडलीतील ग्रह काहीही करू शकत नाही. कोणतेही मंत्र-तंत्र तुमचे वाकडे करू शकणार नाही. भूतापेक्षा भटबाधा घातक ठरत आहेत. त्यामुळे देवाच्या मागे लागण्यापेक्षा प्रयत्नाने कर्तृत्व गाजवून दाखवा, असे महाराव शेवटी म्हणाले. यावेळी प्रा. डॉ. बाबूराव गुरव, प्रसाद कुलकर्णी, अ‍ॅड सुभाष पाटील, संपतराव पवार, उमेश देशमुख, व्ही. वाय. पाटील, धनाजी गुरव, रमेश सहस्त्रबुद्धे, स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने, अरूण माने, सदाशिव मगदूम, प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांच्यासह सर्व डाव्या आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

कॉलर उडविणारे शिवरायांचे वारसदार कसे?

सध्या स्वत:ला छत्रपती शिवरायांचे वारसदार समजणारे खासदारकीसाठी एका पक्षातून दुसर्‍या पक्षात जातात. तर काहीजण कॉलर उडवतात. यांना वारसदार व्हायचे असेल तर शिवरायांच्या विचारांचे होऊन त्यानुसार कृतिशील आचरण करावे, असे टिप्पणी महाराव यांनी यावेळी केली.

कुंडल ते सांगली रॅली

सकाळी कुंडल येथून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. पलूस, आमणापूर, अंकलखोप, भिलवडी, वसगडे, नांद्रे, कर्नाळ या मार्गे रॅली सांगलीत आली. सांगलीत हुतात्मा अण्णासाहेब पत्रावळे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून रॅली कॉलेज कॉर्नर मार्गे शांतिनिकेतन विद्यापीठात दाखल झाली.

Back to top button