सांगली : पळालेला कैदी पत्नीच्या संपर्कात! | पुढारी

सांगली : पळालेला कैदी पत्नीच्या संपर्कात!

सांगली; पुढारी वृत्तसेवा : येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून पलायन केलेला कैदी सुनील ज्ञानू राठोड (वय 26, रा. यळगूड, ता. सिंधगी, जि. विजापूर) हा पत्नीच्या संपर्कात आहे. पोलिस तातडीने लोकेशन माहिती घेऊन त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र तो गुंगारा देत तेथूनही पसार होतो.

तासगाव येथे जेसीबी चालकाचा खून केल्याप्रकरणी राठोड गेल्या वर्षभरापासून कारागृहात बंदी आहे. दि. 31 जुलै रोजी कारागृहातील पिठाची गिरण, विहीर व मंदिर परिसरातील स्वच्छता करण्यासाठी त्याला बरॅकमधून बाहेर काढण्यात आले होते. तेथील दोन पोलिसांची नजर चुकवून तेथील दवाखान्याच्या भिंतीवरून उडी मारून त्याने पलायन केले होते. या घटनेला तब्बल एक महिना होऊन गेला तरी त्याला पकडण्यात अजूनही यश आलेले नाही. राठोड पत्नीच्या संपर्कात येईल, अशी शक्यता असल्याने तिला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचवेळी तो पत्नीच्या मोबाईलवर संपर्क साधताना पोलिसांना समजले. पेठवडगाव (जि. कोल्हापूर) येथील त्याचे लोकेशन निघाले. पोलिस तातडीने तिकडे रवाना झाले. पण तत्पूर्वीच तो तेथून पसार झालेला होता.

पळून गेल्यानंतर तो त्याच्या यळगूड गावी गेलाच नाही. काही दिवस तो त्याच्या मित्रांकडे होता, अशी माहिती पुढे आली आहे. रस्त्यावर जाणार्‍या लोकांना तो अडवतो. काही तरी खोटे कारण सांगून त्यांच्याकडून दोन-तीन मिनिटे मोबाईल मागून पत्नीला फोन करतो. वेगवेगळी शहरे व गावातून त्याने अनेकदा फोन केले आहेत. या लोकेशनवर पोलिस गेले. मात्र तो तेथूनही पसार झालेला असतो. त्यामुळे त्याचा शोध घेणे आव्हान निर्माण झाले आहे. दरम्यान, राठोड पलायनप्रकरणी कारागृहातील दोन पोलिसांची चौकशी करण्यात आली. त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला. वरिष्ठ अधिकार्‍यांना चौकशीचा अहवालही सादर करण्यात आला. पण पुढे खातेनिहाय काहीच कारवाई झालेली नाही. अजूनही चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.

Back to top button