सांगली : पॅचवर्क कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार; महासभेतील आरोपांवर महापौरांचाही दुजोरा | पुढारी

सांगली : पॅचवर्क कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार; महासभेतील आरोपांवर महापौरांचाही दुजोरा

सांगली; पुढारी वृत्तसेवा : महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते पॅचवर्कच्या कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार होत आहे. दोषदायित्व कालावधीतील रस्तेही ठेकेदारांकडून दुरुस्त करून न घेता महापालिकेच्या यंत्रणेकडून केले जात आहेत. नागरिकांच्या पैशावर ठेकेदार पोसण्याचा उद्योग सुरू आहे, असा आरोप शुक्रवारी महापलिकेच्या विशेष महासभेत नगरसेवकांनी केला. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनीही या आरोपांना स्पष्ट दुजोरा दिला. चौकशीचे आदेश दिले. दोष दायित्व कालावधीतील रस्त्यांची दुरुस्ती ठेकेदाराकडूनच झाली पाहिजे, असा आदेशही प्रशासनाला दिला.

महापालिकेची शुक्रवारी विशेष महासभा झाली. अध्यक्षस्थानी महापौर दिग्विजय सूर्यवंशी होते. रस्ते पॅचवर्कचा विषय नगरसेवक अभिजित भोसले यांनी उपस्थित केला. गुंठेवारी भाग, उपनगरातील रस्त्यांवरील खड्डे मुजवण्यासाठी पॅचवर्क होत नसल्याकडे लक्ष वेधले. या भागातील नागरिकांनी गणपती विसर्जन खड्ड्यातून जावूनच करायचे काय, असा खडा सवाल उपस्थित केला. रस्त्यावर केलेले पॅचवर्क पावसात धुऊन गेल्याचा आरोप विवेक कांबळे यांनी केला. मिरजेत पॅचवर्कचे काम ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप मैनुद्दीन बागवान यांनी केला. गणेश विसर्जन कालावधी जवळ आला तरी रस्त्यांचे पॅचर्वक झाले नसल्यावरून संजय मेंढे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. खड्डे लवकर मुजवा, यंत्रणा वाढवा, अशा सूचना दिल्या.

दरम्यान, पावसामुळे खडीकरण व डांबरीकण होत नाही. त्यामुळे मुरूम टाकून पॅचवर्क केले जात असल्याचे शहर अभियंता संजय देसाई यांनी सांगितले. त्यावर मेंढे यांनी आक्षेप घेतला. पाऊस दोन दिवस सुरू आहे, त्याआधी पंधरा दिवस काय केले, असा सवाल केला. विष्णू माने, शेडजी मोहिते, विजय घाडगे यांनीही कुपवाड परिसरात रस्त्यांचे पॅचवर्क, मुरुमीकरण होत नसल्याचा आरोप केला.

मुंबईप्रमाणे सांगलीतही घोटाळा विजय घाडगे म्हणाले, कुपवाडमध्ये चार वर्षात मुख्य रस्त्याचेही पॅचवर्क झाले नाही, तिथे अंतर्गत रस्त्यांच्या पॅचवर्कचा विषयच नाही. काही ठराविक रस्त्यांवरच पॅचवर्कची कामे सुरू आहेत. रस्त्यांच्या दोष दायित्वाचा कालावधी (डीएलपी) असतानाही संबंधित ठेकेदाराकडून रस्ते दुरुस्तीचे काम करून घेणे आवश्यक आहेे. पण अशा रस्त्यावर महापालिकेच्या तिजोरीतून पॅचवर्क सुरू आहे. मुंबई महापालिकेत पॅचवर्क कामात कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तसाच प्रकार सांगली महापालिकेतही सुरू आहे. पॅचवर्कमध्ये मोठा घोटाळा आहे. केवळ कागदावर मुरूम पडत असून प्रत्यक्षात जागेवर खड्डे तसेच आहेत. तीन कोटींचा मुरूम टाकण्यात आल्याचे सांगितले जाते, पण प्रत्यक्षात यातील तीन टक्के मुरुमही कुपवाडमध्ये पडला नाही. कुपवाडमधील विस्तारीत भागासाठी एक कोटींचा मुरूम मंजूर केल्याचे सांगितले, पण हा मुरुमही कुठे दिसत नाही. या सर्व प्रकाराची चौकशी करावी.

फोटो, माहिती माझ्याकडे : महापौर

महापौर सूर्यवंशी म्हणाले, ज्या रस्त्यांच्या कामांचा दोष दायीत्व कालावधी अजून संपलेला नाही. त्यांची दुरुस्ती संबंधित ठेकेदाराकडून होणे आवश्यक आहे. यामध्ये शासनाकडून आलेल्या शंभर कोटींतील काही कामांचाही समावेश आहे. वर्षापूर्वी जी कामे झाली, त्याचे फलक व त्यावरील तारीख स्पष्ट दिसत असतानाही अशा रस्त्यांची दुरुस्ती संबंधित ठेकेदाराकडून करून न घेता महापालिकेच्या पैशातून केली जात आहे. त्याचे काही फोटो, माहिती माझ्याकडे आली आहे. पॅचवर्क कामात मोठा घोटाळा होत आहे. ठेकेदार पोसण्याचा उद्योग सुरू आहे. याप्रकरणी आयुक्तांनी चौकशी करावी. संबंधितांवर कारवाई करावी. डीएलपी कालावधीतील रस्ते दुरुस्तीचा खर्च संबंधित ठेकेदाराकडून वसूल करावा. कुपवाड तसेच गुंठेवारी व विस्तारीत भागातील रस्त्यांवरील खड्डे भरून घ्यावेत.

गणेश विसर्जनापूर्वी खड्डे मुजवा : आयुक्‍त

रस्ते पॅचवर्क कामासाठी यंत्रणा वाढवा. खड्डे मुरुमाने भरण्याऐवजी कोल्डमिक्स, काँक्रिट मिक्सने रस्त्यावरील खड्डे मुजवा. गणेश विसर्जनापूर्वी रस्त्यांवरील खड्डे मुजवा, असा आदेश आयुक्त सुनील पवार यांनी शहर अभियंते संजय देसाई यांना दिला.

Back to top button